गुजराती माध्यमाचे शिक्षक घेण्यास नकार सरकारचा आग्रह : पालिकेच्या माथी मारण्याचा प्रयत्न
By admin | Published: July 19, 2015 9:34 PM
नवी मुंबई : गुजराती माध्यमाचे अतिरिक्त झालेले ४२ शिक्षक महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेत समाविष्ट करून घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. गुजराती शिक्षक हिंदी व्यवस्थित शिकवू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल त्यामुळे शिक्षण मंडळाने त्यास नकार दिला आहे. परंतु सरकारने अनुदान बंद करण्याचा इशारा दिल्यामुळे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई : गुजराती माध्यमाचे अतिरिक्त झालेले ४२ शिक्षक महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेत समाविष्ट करून घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. गुजराती शिक्षक हिंदी व्यवस्थित शिकवू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल त्यामुळे शिक्षण मंडळाने त्यास नकार दिला आहे. परंतु सरकारने अनुदान बंद करण्याचा इशारा दिल्यामुळे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. सरकार शिक्षक भरतीला मंजुरी देत नाही. त्यामुळे महापालिकेने ठोक मानधनावर शिक्षकांची भरती केली आहे. परंतु या शिक्षकांना कायम सेवेत घेता येत नाही. शिक्षकांच्या रिक्त जागांवर राज्यात विशेषत: मुंबई व ठाणे परिसरात अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना घेण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. मुंबईमधील गुजराती माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याचे प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहेत. यापूर्वी शासनाने ४२ शिक्षक महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये सामावून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु शिक्षण मंडळाने प्रस्ताव फेटाळून लावला होता. गुजराती माध्यमाचे शिक्षक सामावून घेण्यासाठी सरकारने दीड वर्षांपासून पालिकेला सूचना केल्या आहेत. परंतु शिक्षण मंडळाने ठामपणे नकार दिला आहे. शासनाने याविषयी पालिकेवरील दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. ...गुजराती माध्यम व इतर माध्यमांचे अतिरिक्त झालेले शिक्षक महापालिकेमध्ये सामावून घेण्यासाठी आमचा यापूर्वीही विरोध होता. यापुढेही राहील. शिक्षक न घेतल्यास अनुदान बंद करण्यात येईल अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. परंतु वेळ पडली तर अनुदान नाकारू पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. - सुधाकर सोनावणे, महापौर