स्थानिक पातळीवरच रोजगार निर्मिती व्हावी-ॲड. अणे
By admin | Published: August 08, 2015 12:23 AM
व्हीजन नेक्स्ट ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन
व्हीजन नेक्स्ट ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटननागपूर : विदर्भातील युवकांची वेगळी छाप आहे. ही ओळख त्यांना कमीपणाची वाटायला नको. ही छाप पुसल्या जाता कामा नये. किंबहुना त्यांच्या रोजगारासाठी मुंबई किंवा पुण्याच्या चष्म्यातून पाहिले जाऊ नये. येथे चांगली संधी मिळाली तर पुणे-मुंबईला जाण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळे स्थानिक जिल्हा पातळीवरच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. श्रीहरी अणे यांनी केले.व्हीजन नेक्स्ट फाऊंडेशनद्वारे संचालित व्हीजन नेक्स्ट ट्रेनिंग सेंटरचे ॲड. अणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, ज्येष्ठ विचारवंत योगानंद काळे, व्हीजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.ॲड. श्रीहरी अणे पुढे म्हणाले, विदर्भातील ८० टक्के जनता शेतकरी किंवा आदिवासी आहे. काही रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आपण काही करू शकत नाही ही शोकांतिका आहे. विदर्भातील तरुणांसाठी २३ टक्के नोकऱ्या मिळाव्यात, असे राज्यघटनेत नमूद आहे. मात्र येथील तरुणांना सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये २.५ टक्केच नोकऱ्या मिळतात. एकट्या पुणे विभागाच्या वाट्याला ५३ टक्के नोकऱ्या गेल्याचे त्यांनी सांगितले. रोजगाराच्या मागे लागण्यापेक्षा येथील सुविधांचा उपयोग करून गाव पातळ्यांवर रोजगार निर्माण करण्याचे आवाहन करीत व्हीजन नेक्स्टला त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी डॉ. शरद निंबाळकर म्हणाले, विदर्भातील तरुणांमध्ये ज्ञान आणि कौशल्यही आहे, मात्र त्यांना ते मांडता येत नाही. त्यामुळेच आपल्याकडचा तरुण मागे आहे. ज्ञानाचे सादरीकरण करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. विदर्भात वन संशोधन विद्यापीठ स्थापन झाल्यास रोजगार वाढेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. परफार्मन्स बेस्ड शिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी व्हीजन नेक्स्टच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी योगानंद काळे म्हणाले, आपला भारत तरुणांचा देश आहे. मात्र उद्योगांमध्ये दरवर्षी १ कोटी ३० लाख प्रशिक्षित तरुणांची गरज असतांना आपण केवळ ३० लाख कुशल मनुष्यबळ तयार करू शकतो. व्यवसाय कौशल्य असलेले उद्योगान्मुख तरुण निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.अभ्यंकर नगर येथील तुलसी विहार येथे सुरू झालेल्या प्रशिक्षण केंद्रात आयटी, डिजिटल मार्केटिंग, विदेशी भाषा,मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह, विक्री व्यवस्थापन आदी अभ्यासक्रम शिकविले जातील.