वर्गात अतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी परवानगी
By admin | Published: July 06, 2015 11:34 PM
गोवा विद्यापीठाचा निर्णय
गोवा विद्यापीठाचा निर्णयपणजी : राज्यातील महाविद्यालयांना वर्गांतील विद्यार्थ्यांची आवश्यकतेनुसार संख्या वाढविण्यासाठी गोवा विद्यापीठाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशाची समस्या सुटणार असल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.ज्या महाविद्यालयांकडून अतिरिक्त विद्यार्थ्यांना वर्गात सामावून घेण्याची परवानगी मागण्यात आली होती, त्या सर्व महाविद्यालयांना तशी परवानगी देण्यात आली आहे. गोवा विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. पी. कामत यांनी ही माहिती दिली. अनेक महाविद्यालयांकडून तशी मागणी करण्यात आली होती. वर्गात ६ ते १० पर्यंत संख्या वाढविण्याची त्यात मागणी होती. सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्यामुळे प्रवेशाची समस्या सुटल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.यंदा बारावीला अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे पदवी अभ्यासक्रमासाठी समस्या निर्माण झाली होती. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही विभागांत समस्या निर्माण झाली होती. १४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांचे भवितव्य अधांतरी राहिले होते. त्यासाठी महाविद्यालयांना अतिरिक्त वर्ग देण्याची तयारी उच्च शिक्षण खात्याने ठेवली होती. काही महाविद्यालयांनी त्याचा लाभ उठवित अधिक वर्ग सुरूही केले; परंतु साधनसुविधा नसल्यामुळे सर्वच महाविद्यालयांत अतिरिक्त वर्ग सुरू करता आले नाहीत. त्यामुळे आहे त्याच वर्गात अधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची परवानगी देण्यासाठी अनेक महाविद्यालयांकडून गोवा विद्यापीठाला अर्ज करण्यात आले होते. उच्च शिक्षण खात्याकडूनही तसे पत्र विद्यापीठाला पाठविण्यात आले होते. (प्रतिनिधी)