आंदोलनामुळे त्रस्त : विद्यार्थ्यांनाही लावणारा चापनाशिक : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी भांडणार्या विद्यार्थी संघटना सनदशीर मार्गाचा अवलंब न करता आक्रमक भूमिका घेत असल्याच्या अनुभवामुळे पुणे विद्यापीठाने चिंता व्यक्त केली आहे. कोणत्याही मुद्द्यावर आंदोलन करताना विद्यार्थी संघटना अधिकार्यांना अवमानकारक भाषेचा वापर करीत असल्याचा अनुभव आल्याने विद्यापीठाने आता विद्यार्थी संघटनांकडे जाऊ नये यासाठी संबंधित महाविद्यालयांनाच तंबी देणार असल्याचे समजते. सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या, ४६ शैक्षणिक विभाग आणि ४७४ महाविद्यालये असा मोठा कारभार पुणे विद्यापीठामार्फत चालतो. नाशिक, नगर आणि पुणे अशा तीन जिल्ातील महाविद्यालये आणि विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. इतका मोठा विस्तार असल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचे अनेकदा प्रश्न निर्माण होतात. विद्यापीठाच्या अधिकृत मंडळांवर याविषयीदेखील चर्चा होते. कित्येकदा विद्यार्थी संघटना विद्यापीठाकडून झालेल्या चुका निदर्शनास आणून देतात. त्यातून कित्येकदा मार्ग निघतो, काही प्रश्नांना विलंबदेखील लागतो. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी विद्यार्थी संघटनांची भूमिका असते. त्यामुळे विद्यार्थी संघटना आंदोलनाचा मार्ग अवलंबितात. मात्र अशा प्रकारचे आंदोलन करताना विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्यापीठाचे किंवा उपकेंद्रांचे अधिकारी वेठीस धरले जातात. विद्यार्थी संघटनांचे काही अतिउत्साही कार्यकर्ते संबंधित अधिकारी आणि व्यवस्थेविषयी अवमानकारक विधाने करीत असल्याची बाब विद्यापीठाच्या अधिकार्यांनी कथन केल्यामुळे सदर आंदोलने विद्यापीठापर्यंत येऊच नये यासाठी विचारविनिमय केला जात आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही प्रश्न असले तरी ते महाविद्यालयीन पातळीवरच सोडविले जावेत, महाविद्यालयाने विद्यापीठ आणि संबंधित विद्यार्थ्यांचा समन्वय साधून कार्य करावे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे प्राथमिक काम महाविद्यालयीन पातळीवरच व्हावे यासाठी विद्यापीठ महाविद्यालयांना सुचना देणार असल्याचे समजते. विद्यार्थी संघटनांकडे जाणारच नाहीत याची खबरदारी घ्यावी अन्यथा विद्यापीठालाच याबाबत जबाबदार धरण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे. सध्या अभियांत्रिकीचा मुद्दा ज्वलंत असल्यामुळे तूर्तास लागलीच याविषयी चर्चा होणार नसली तरी येत्या काही दिवसांत याबाबतचे धोरण निश्चित करून विद्यार्थ्यांचे प्रश्न महाविद्यालयीन पातळीवरच सोडविण्याबाबत तोडगा काढला जाणार आहे. तशी यंत्रणा पुणे विद्यापीठात कार्यान्वित करण्याचादेखील विचार असून, संबंधित शाखा केवळ निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरच लक्ष केंद्रित करणार आहेत. --जोड देत आहे---
पुणे विद्यापीठ देणार महाविद्यालयांना तंबी?
By admin | Published: July 06, 2016 9:18 PM