पाऊस
By admin | Published: August 13, 2015 10:34 PM
शाळा - महाविद्यालये झालीत बंद
शाळा - महाविद्यालये झालीत बंद नागपूर : धुवाधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडली. सकाळी मुसळधार पावसामुळे पहाटेपासूनच रस्त्यांवर पाणी साचले होते. रस्ते दिसत नव्हते आणि ठिकठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. अनेक लोक कार्यालयात जाण्यासाठी रेनकोट घालून निघाले पण रस्त्यावर तयार झालेल्या तलावातून मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेक पगारदार कर्मचारी माघारी वळले. त्यात लहान मुलांच्या काळजीपोटी अनेक पालकांनी मुलांना सकाळी शाळेत पाठविले नाही. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या नगण्य होती. दुपारपर्यंत पाऊस धो धो कोसळत असल्याने आणि शहरात पाणी साचल्याने शाळांमध्येही भीतीचे वातावरण होते. त्यामुळे शाळा सुरू झाली पण अभ्यासाचे वातावरण नव्हते. त्यातच शाळा व्यवस्थापनाने काही काळानंतर शाळेला सुटी देणे योग्य ठरविले. पावसाचा कहर पाहता अनेक शाळांनी शाळेला सुटी दिली तर काहींनी नाममात्र वेळ शाळा घेऊन शाळेला सुटी देण्याचा निर्णय घेतला. यामागे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची भावना होती. अनेक महाविद्यालयात तर आज एकही तासिका होऊ शकली नाही. प्राध्यापक वर्ग महाविद्यालयांमध्ये कसेबसे पोहोचले पण महाविद्यालयात विद्यार्थीच पोहोचू शकले नाही. त्यात मुसळधार पाऊस सुरू होता. अखेर अनेक संस्थांनी महाविद्यालयांना सुटी दिली. ------स्कूल व्हॅन्स, ऑटो आलेच नाहीत.पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच कहर केला. अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी ऑटो आणि स्कूल व्हॅन्स लावल्या आहेत. पण पावसाचे रौद्र रुप पाहता स्कूल व्हॅन चालक आणि ऑटो चालकांनी मुलांना शाळेत नेणे धोक्याचे समजून आज सेवा दिली नाही. पाऊस थांबेल आणि शाळा सुरळीत होतील, असे पालकांनाही वाटले होते. त्यामुळे स्कूल व्हॅनची प्रतीक्षा करीत विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तयार होते. पण स्कूल व्हॅन चालकांनीच अनेक पालकांना बाहेर पूरसदृश स्थिती असल्याचे सांगून आज शाळेत पाल्यांना पाठवू नका, असे आवाहन केले. स्कूल व्हॅन चालक सकाळी नियमित सेवा देण्यासाठी बाहेर पडल्यावर शहरातल्या अनेक भागात पाणी साचल्याचे दृश्य पाहून मुलांना शाळेत नेणे घातक ठरु शकते, हे ओळखले. त्यामुळे जवळपास सर्वच स्कूल व्हॅन चालकांनी परस्परांना दूरध्वनी करून संभाव्य धोक्याची कल्पना दिली. तसेच पालकांनाही दूरध्वनीवर शहरातील स्थिती भयावह असल्याची कल्पना दिली. त्यामुळे पालकांनीही मुलांना शाळेत न पाठविण्याचाच निर्णय घेतला.