आपली क्षमता हे यशाचे रहस्य: कुंभेजकर
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM
सोलापूर :
सोलापूर : विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून आपले जीवन समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन युपीएससीमध्ये निवड झालेले अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.द. भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात आपल्या यशाचे रहस्य कुंभेजकर यांनी सांगितले. आपल्या मनोगतातून त्यांनी आपला जीवनपट उलगडून दाखवला. आपल्या मनाची साद ऐकूनच युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अभ्यास करीत असताना ठराविक मर्यादेपेक्षा क्लासचा उपयोग होतो, परंतु आपण टिपण काढून विविध अंगाने अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. अधिक माहितीसाठी प्रशासकीय अधिकार्यांचे ब्लॉग वाचावेत. जेणेकरुन मुलाखत, व्यक्तिमत्त्व विकास यांची तयारी होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही. बी. उबाळे यांनी केले. त्यांनी भारतातील हजारो विद्यार्थ्यांमधून योगेश कुंभेजकर कसे यशस्वी झाले, त्यांना आदर्श मानून सर्वांनी प्रशासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परीक्षेची कसून तयारी करावी, असे आवाहन केले. याप्रसंगी योगेशचे वडील विजय कुंभेजकर यांनी आपला मुलगा यशस्वी होण्यासाठीचे योगदान सांगितले. ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी यांनी यामागची प्रेरणा सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय समारोप डॉ. आर. एन. मुळीक यांनी केला. एस. पी. देशमुख यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचा ३५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पी. एच. बासुतकर, डॉ. व्ही. व्ही. शागालोलू, डॉ. व्ही. सी.दंडे, एस. व्ही. राजमाने यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)