ऋतुराज क्रिकेटपासून दूर! पण पत्नीनं महाराष्ट्रासाठी लढवला 'किल्ला', गायकवाडने घेतली फिरकी

utkarsha pawar cricketer: मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या क्रिकेटपासून दूर आहे.

मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या क्रिकेटपासून दूर आहे. अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. मात्र, त्याची पत्नी उत्कर्षा पवार महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कर्षा महाराष्ट्राच्या संघाकडून खेळते.

सध्या 'महिला सीनिअर एकदिवसीय ट्रॉफी'ची स्पर्धा खेळवली जात आहे. आज महाराष्ट्र आणि उत्तराखंड यांच्यात लढत झाली, मात्र महाराष्ट्राला पराभवाचा सामना गमवावा लागला. सामन्यात उत्कर्षा पवारने महाराष्ट्रासाठी अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या ८ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २४ धावा देत १ बळी घेतला.

तिने ३.०० च्या सरासरीने गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले. तिच्या अप्रतिम गोलंदाजीनंतरही महाराष्ट्राला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. उत्कर्षाचा एक फोटो तिचा पती ऋतुराज गायकवाडने शेअर केला, ज्यामध्ये ती गंभीर असल्याचे दिसते.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २०१ धावा केल्या. सलामीवीर पुनम रावतने ५१ धावांची खेळी केली तर कांचन परिहारने ७९ चेंडूत ६० धावांची उत्कृष्ट खेळी केली.

२०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा डाव ४९.५ षटकांत १९३ धावांत आटोपला. महाराष्ट्राकडून टीएस हसबिन्सने १०५ धावांची खेळी केली. तिची शतकी खेळीही संघाला उपयोगी पडू शकली नाही आणि महाराष्ट्राने हा सामना ९ धावांनी गमावला.

मागील वर्षी ऋतुराज आणि उत्कर्षा विवाहबंधनात अडकले. ३ जून २०२३ रोजी त्यांनी लग्न केले. गायकवाड त्यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग होता, पण त्याने लग्नासाठी संघातून आपले नाव मागे घेतले.

२४ वर्षीय उत्कर्षा आणि ऋतुराज यांनी प्रेमविवाह केला आहे. लग्नाआधी आयपीएल २०२३ च्या फायनलदरम्यान दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते.