MS Dhoni, CSK Cricketer Retirement: "धोनीने संधी दिली असती, तर माझंही करियर घडलं असतं"; निवृत्तीच्या निर्णयानंतर रोखठोक विधान

- ३३व्या वर्षीच CSKच्या स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती - न्यूझीलंड, इंग्लंड मालिकेसाठी झाली होती निवड पण संधी मिळाली नाही

MS Dhoni, CSK Cricketer Retirement: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने अनेक बडे खेळाडू भारतीय क्रिकेटला दिले. पण काही खेळाडू संघात असूनही त्यांना अपेक्षित संधी दिली गेली नाही. अशाच एका क्रिकेटपटूने नुकतीच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

निवृत्ती घेतल्यानंतर त्या खेळाडूने महेंद्रसिंग धोनीबाबत काही खळबळजनक विधाने केली. 'सीएसके'च्या या खेळाडूची न्यूझीलंड आणि इंग्लंड मालिकेसाठीही भारतीय संघात दोनदा निवड झाली होती, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळू शकली नाही. त्याची आजही त्याला खंत आहे. मात्र याबाबत बोलताना त्याने महेंद्रसिंग धोनीबाबत रोखठोक मते मांडली आहेत.

CSK चा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे (Ishwar Pandey) याने मध्य प्रदेश संघाला प्रथमच रणजी करंडक जिंकून दिला. मात्र त्याला संधी न मिळाल्याने त्याने ३३व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ईश्वरने माध्यमांशी बोलताना सांगितले धोनीबाबत आपली स्पष्ट मते मांडली.

ईश्वर पांडेने आपल्या कारकिर्दीत एकूण ७५ प्रथम श्रेणी सामने खेळले असून २५.९२ च्या सरासरीने २६३ विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण ७१ टी२० सामने खेळले. यामध्ये त्याने ६८ विकेट्स घेतल्या. ईश्वर पांडेने IPL मध्ये एकूण २५ सामने खेळले असून त्यात १८ विकेट्स घेतल्या. तो मध्य प्रदेश, सेंट्रल झोन, इंडिया अ, चेन्नई सुपर किंग्ज, पुणे वॉरियर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स अशा एकूण ६ संघांकडून खेळला.

ईश्वर पांडेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात भले मोठे पत्र लिहित त्याने BCCI आणि मध्य प्रदेश क्रिकेटचे तसेच IPL फ्रँचायझी CSKचे आभार मानले. तसेच विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैना यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह ड्रेसिंग रूम शेअर केल्याचा अभिमान असल्याचे सांगितले.

धोनीने संधी दिली असती, तर माझंही करियर घडलं असतं!- ईश्वरने निवृत्तीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, "महेंद्रसिंग धोनीने आपल्यावर थोडा विश्वास दाखवला असता आणि त्याला संधी दिली असती तर त्याची कारकीर्द चांगली झाली असती. २३-२४ वर्षांचा असताना त्याचा फिटनेसही उत्कृष्ट होता आणि तो चांगला खेळही खेळत होता. त्यावेळी धोनी संघात संधी देईल अशी आशा होती. पण तसं घडलं नाही."