धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोड वरील स्वर्ण पॅलेस या सराफा पेढीवर भल्या पहाटे अज्ञात व्यक्ती जबरी चोरी करीत तब्बल १ कोटी १० लाखांचे सोने चांदीचे दागिने आणि १० हजाराची रोख रक्कम चोरुन नेली असल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. या चोरीमुळे आग्रारोडसह शहरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
काल पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी स्वर्ग पॅलेस ज्वेलर्सच्या मागील बाजूला असलेल्या शटरचे लॉक कापून शेटर उघडून आता प्रवेश केला आणि आत मधील काचा फोडून हाती लागेल तेवढे सोने चांदीचे दागिणे, ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोने तसेच चांदी आणि गल्ल्यातील १० हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेला आहे. अशी माहिती स्वर्ण पॅलेसचे मालक प्रकाश जोरावलमल चौधरी यांनी दिली आहे. पोलिस गाडीचे सायरन ऐकून चोरटे पळाले.
ही जबरी चोरी करण्यापुर्वी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. चोरटे आत शिरून चोरी करीत असतानाच आग्रारोडवर पोलिसांच्या गस्ती पथकाच्या वाहनाचे सायरन ऐकू आल्याने चोरटे मागील गल्लीतून अंधाराचा फायदा उचलून पळून गेले. असेही स्वर्ण पॅलेसचे मालक प्रकाश चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, चोरटे मध्यरात्री उशिरा २ नंतर दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या शेटरचे कुलूप कडी तोडून आत शिरले आणि मांडणीतील दागिणे, सोने चोरत होते, २.४५ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या गस्ती पथकाच्या वाहनाचे सायरन ऐकून चोरटे बाहेर पळाले. त्यामुळे हाती लागेल तेवढा ऐवज त्यांनी नेला. दुकानातील हिरे, खडे मात्र चोरांना मिळाले नाहीत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, श्वान पथक, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, संजय गायकवाड, धनंजय मोरे, रवी राठोड, पंकज खैरमोडे, मयुस सोनवणे, आझाद नगर पोलीस ठाण्याचे हवलदार पिंटू शिरसाठ, संदीप कढरे, शकील शेख, चालक संतोष घुगे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. संबधित चोरटे दुकानातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले. असून लवकरच त्यांना जेरबंद करत चोरीचा उलगडा करणार असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.