सदानंद नाईक
उल्हासनगर : ऍग्रो गोट फार्म कंपनीत जादा परताव्याचे आमिष दाखवून एकूण ४१४ जणांना पैसे गुंतवणूक करण्यास भाग पडून त्यांची १ कोटी ३८ लाख ३० हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी ४ जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
उल्हासनगरात रवींद्रसिंग पन्नू, रमेश गुप्ता, इशाक अन्सारी व जगताप सिंग यांनी ऍग्रो गोट फार्म कंपनी स्थापन केली. यामध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना पैसे गुंतवणूकीस भाग पाडले. गुंतवणूकदारा पैकी फिर्यादी असलेले देवराम किसन गावित यांच्यासह पहिल्या टीम मधील ३६३ नागरिकांनी ९० लाख १० हजार तर दुसऱ्या टीम मधील ५१ जणांनी ४८ लाख २० हजार असे एकूण ४१४ जणांनी १ कोटी ३८ लाख ३० हजाराची गुंतवणूक केली. १ जून २०१८ ते २० ऑगस्ट २०२० दरम्यान रिजेन्सी प्लाझा शांतीनगर येथे सदर प्रकार झाला. गुंतवणूकदारा पैकी देवराम गावित यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, रवींद्रसिंग पन्नू, रमेश गुप्ता, इशाक अन्सारी व जगताप सिंग यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ऍग्रो गोट फार्म कंपनीत जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४१४ जणांची १ कोटी ३८ लाख ३० हजाराची फसवणूक करणाऱ्या चौघांचे दुसरीकडे असेच कनेक्शन आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करीत असून जादा आमिषाला बळी पडणाऱ्या नागरिकांनी आतातरी धडा घ्यावा. असा सल्ला यानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांनी नागरिकांना दिला. पोलीस अधिक तपास करीत असून असा प्रकार इतर ठिकाणी केला का? याबाबत माहिती घेत आहेत.