मुंबई - अमली पदार्थविरेधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १ कोटी १८ लाख ७८ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. तसेच, एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. डोंगरी परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. डोंगरीतल्या फेब हाऊसमध्ये धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत १ कोटी १० लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यासोबतच ८ लाख ७८ हजारांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सनम तारीक सय्यद (२५) या महिलेला ड्रग्ज आणि रोख रक्कमेसहित अटक करण्यात आली आहे. या कारवाईत १ किलो १०५ ग्रॅम मेफीड्रॉन नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात लाखो, करोडो रुपयांच्या ड्रग्जतस्करीत सहभागी असणाऱ्या दोन महिलांना अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. नुकतेच कुर्ल्यातून एका महिलेला ड्रग्ज विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली होती.पोलिसांनी सबिना खान या आरोपीला अटक केल्यानंतर तिच्याकडून ड्रग्ज देखील जप्त केले होते. गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज संबंधी अनेक कारवाया समोर येत आहेत. यामध्ये अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांचीही नावं समोर आली आहेत. त्यानंतर सतत ड्रग्ज पॅडलर्सविरोधी कारवायांचं सत्र सुरुच आहे.