कानपूर – गुरुग्रामहून २ मित्रांसोबत गोरखपूरला फिरण्यासाठी आलेले कानपूरच्या व्यवसायिक मनिष गुप्ता यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. चौकशीचा विरोध करण्यावरुन पोलीस कर्मचाऱ्यांना मनिष गुप्ता यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मंगळवारी ४ वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन मनिषची पत्नी मिनाक्षी न्याय मागण्यासाठी पुढे आली आहे. पित्याच्या मृत्यूबाबत मुलाला काय सांगू? असा सवाल तिने केला आहे. तसेच, सरकारने देऊ केलेल्या 10 लाख रुपयांच्या मदतीवरही तिने प्रश्न उपस्थित केला आहे.
मिनाक्षी यांनी पतीच्या निधनानंतर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. बिकारु हत्याकांडमध्ये जे पोलीस शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. पण, पोलिसांनी माझ्या निर्दोष पतीला ठार केले, तेव्हा 10 लाख रुपयांची मदत देतात. हा कुठला न्याय आहे. पोलीस शहीद झाल्यास 1 कोटी आणि पोलिसांनी ठार केल्यास 10 लाख?, असा प्रश्न मिनाक्षी यांनी विचारला आहे.
संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्या मृत्यूच्या आक्रोश करत पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. जर माझा मुलगा पोलीस बनणार असेल तर त्याला का बनायला सांगू? लोकांच्या रक्षणासाठी असणाऱ्या पोलिसांनीच माझ्या पतीचा जीव घेतला. लोकांना ठार करण हे पोलिसांचे काम आहे का? मिनाक्षीच्या या प्रश्नाची उत्तरं कुणाकडेच नाहीत. माझ्या नवऱ्याला मारहाण करण्यात आली. कुठल्या कायद्यातंर्गत पोलीस चेकिंगच्या बहाण्याने अर्ध्या रात्री खोलीत घुसले आणि मारहाण करत पतीचा जीव घेतला. या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करूनही न्याय मिळत नाही.
मिनाक्षीच्या पतीचा मृत्यू झाल्याचं त्याच्या मित्रांनी घरच्यांना सांगितले. तेव्हा पहाटे ५ वाजता ते तिथे पोहचले. मृतदेह पाहताच किती बेदम मारहाण झालीय त्याचा अंदाज येऊ शकतो. शरीरावर अनेक ठिकाणी जखमा दिसत होत्या. माझ्या पतीचा मृत्यू पडल्याने नाही तर मारहाणीत झालाय. मला न्याय हवाय असं मिनाक्षी सगळ्यांना ओरडून सांगत आहे. मनिषच्या घरी जेव्हा पोलिसांनी तपासणी केली तेव्हा त्यांनी स्थानिक भाजपा नेत्यांना फोन करून माहिती दिली. जबरदस्तीने पोलीस कर्मचाऱ्यांनी मनिषला पोलीस स्टेशनला नेले.
सपा नेत्यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट
बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये मनिषची पत्नी मिनाक्षीला भेटण्यासाठी सपाचे नेते पोहचले होते. त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असं म्हटलं. या ३ मित्रांबाबत अशी कुठली माहिती आली ज्यामुळे पोलिसांनी अर्ध्या रात्री चेकिंग केली. तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये पोलीस का गेले? जर मनिष जखमी झाले असतील तर त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात न नेता खासगी रुग्णालयात का नेले? मनिषचा पडून मृत्यू झालाय असं पोलीस सांगतात मग शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्याच्या खूणा कुठून आल्या? मनिषच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी न देता त्याच्या मित्रांनी का दिली? या प्रश्नांची उत्तरं मनिषा शोधत आहे.
प्रत्यक्षदर्शी मित्रानं काय सांगितले?
हॉटेलच्या रुममध्ये मित्रांसोबत असलेल्या हरदीप सिंहने सांगितले की, रात्री पोलीस चेकिंग करण्यासाठी खोलीत घुसले. तेव्हा प्रदीप, मनिष बेडवर झोपले होते. खोलीची बेल वाजल्यानंतर मी दरवाजा उघडला. आयडी मागितल्यावर आम्ही दिलं. मनिषला जाग आली तेव्हा तो म्हणाला आम्ही दहशतवादी दिसतोय का? पोलिसांना हीच गोष्ट खटकली आणि त्यांनी मनिषला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हा मनिष तोंडावर खाली पडला. ज्यात त्याची अवस्था खराब झाली. त्याला घेऊन पोलीस नर्सिंग होमला गेले परंतु आम्हाला सोबत नेलं नाही असं मनिषच्या मित्रांनी सांगितले. आता मनिषची पत्नी त्याच्या मृत्यूबद्दल न्याय मागत आहे.