सदानंद नाईक
उल्हासनगर : मोटारसायकलच्या सायलेन्सर मध्ये मोडीफाईड करून चित्र-विचित्र आवाज काढणाऱ्या तरुणावर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. जप्त केलेले ९३ सायलेन्सर शिवाजी चौक ते लाल बहादूर शास्त्री चौक दरम्यान रस्त्यावर अंथरून त्यावरून रोलर फिरविला, असे चित्र-विचित्र आवाज काढणाऱ्यावर कारवाईचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत भरणे यांनी दिली.
उल्हासनगरातील तरुण नवीन मोटरसायकलच्या सायलेन्सरमध्ये मोडीफाईड करून चित्र विचित्र व कर्कश आवाज काढण्याच्या घटनेत वाढ झाल्याच्या तक्रारी शहर वाहतूक विभागाकडे आल्या होत्या. शहर वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत भरणे यांच्या वाहतूक विभागाच्या पथकाने कारवाई करून तब्बल ९३ मोडीफाईड केलेले सायलेन्सर जप्त केले. तसेच ई-चलनद्वारे १ लाख ३२ हजाराचा दंड वसूल केला. जप्त केलेले मोडीफाईड सायलेन्सर कॅम्प नं-३ येथील शिवाजी चौक ते लालबहादूर शास्त्री चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर अंतरुन त्यावरून रोलर चालविला. याप्रकारने तरुणांत आपल्या कर्तव्याची जाणीव होईल. अशी आशा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत भरणे यांनी व्यक्त केली.
नवीन मोटरसायकल मध्ये मोडीफाईड केलेल्या सायलेन्सर मधून चित्र विचित्र व कर्कश आवाज येत असल्याने, ध्वनी प्रदूषण होते. तसेच वृद्ध, लहान मुले, रुग्ण आदींना याचा त्रास होत होता. शहरातील श्रीराम चौक, नेताजी चौक, भाटिया चौक, लालचक्की, संभाजी चौक, सुभाष टेकडी स्टेशन रस्ता, कैलास कॉलनी, कुर्ला कॅम्प रस्ता, कॅम्प नं-५ येथील मुख्य मार्केट रस्ता आदी ठिकाणी अद्यापही कर्कश, चित्र-विचित्र आवाज मोडीफाईड केलेल्या मोटरसायकलच्या सायलेन्सर मधून येतो. उल्हासनगर शहर वाहतूक विभाग प्रमाणे विठ्ठलवाडी वाहतूक शाखेने कारवाई करण्याची मागणी होत आहे. भर रस्त्यावर मोडीफाईड केलेले सायलेन्सर टाकून त्यावर रोलर चालविल्याने, तरुणांमध्ये जनजागृती व भीती निर्माण होण्यासाठी प्रयत्न केला. अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत भरणे यांनी दिली.