नवी मुंबई - गुन्हे शाखा पोलिसांनी ब्राऊन शुगर विक्रीच्या तयारीत असलेल्या एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ३८ हजार रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त केली आहे. अटक केलेला तरुण वाशीचा राहणारा आहे.
मयूर उर्फ पोशा कार्तिक सरकार (वय - ३०) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो वाशी सेक्टर ९ चा राहणारा आहे. वाशीच्या जुन्या खाडीपूल परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी ब्राउन शुगर विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी तपास पथक तयार केले होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह हवालदार चौधरी, एम. आय. शेख, इनामदार, गायकवाड, पिरजादे, पोलीस नाईक सचिन भालेराव यांचा समावेश होता. त्यांनी शुक्रवारी रात्री वाशीच्या जुन्या खाडीपूल परिसरात सापळा रचला होता. यावेहील त्याठिकाणी मयूर हा संशयास्पदरित्या वावरताना आढळला. त्याच्या अंग झडतीमध्ये त्याच्याकडे १९ ग्रॅम ब्राऊन शुगर आढळून आली. बाजारभावानुसार त्याची किंमत १ लाख ३८ हजार ५०० रुपये असल्याचे बुधवंत यांनी सांगितले. याप्रकरणी त्याच्याविरोधात एनडीपीएस अंतर्गत वाशी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला ७ ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने हे ब्राऊन शुगर कुठून आणले याचा अधिक तपास अमली पदार्थही विरोधी पथक करत आहे.