नालासोपारा - पश्चिमेकडील श्रीप्रस्थमधील सुंदरम प्लाझा इमारतीमध्ये बॅसिन एक्सपोर्ट लि. नावाचे हे बोगस कॉल सेंटर २५ दिवसांपूर्वीच थाटले होते. या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकून १० आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घातला जात होता. आरोपींना गुरुवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील दोन मुख्य सूत्रधारांची नावे निष्पन्न झाली असून ते फरार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १० आरोपी, फरार आरोपी जुबेर व प्रदीप यांनी आणि त्यांच्या अमेरिकेतील साथीदारांच्या मदतीने कटकारस्थान करून डार्क वेबवरून अमेरिकेतील नागरिकांचे एस.एस.एन. नंबर, मोबाइल क्रमांक इत्यादी गोपनीय माहिती चोरायचे. नंतर या कॉल सेंटरच्या ठिकाणी नेमलेले कर्मचारी आरोपी त्या माहितीच्या आधारे व बेकायदेशीर कॉल सेंटर चालवून व्ही.ओ.आय.पी. सर्व्हिसद्वारे अमेरिकन नागरिकांना कॉल करायचे. आरोपी कर्मचारी हे अमेरिकेतील सोशल सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशन अधिकारी असल्याची बतावणी करून त्या अमेरिकन नागरिकांना गंभीर गुन्हा केल्याचे सांगायचे. दोषारोपपत्र दाखल होऊन तुम्हाला जेलमध्ये जावे लागणार, नोकरी जाणार, वाहन परवाना रद्द होणार, मालमत्ता जप्त होणार, सिक्युरिटीकार्ड काळ्या यादीत जाणार, असे इंग्रजीत सांगून भीती व दहशत निर्माण करून हजारो डॉलर रक्कम भरण्यास लावायचे.दोन्ही फरार आरोपींनी अमेरिकन साथीदारांसह नियोजितरीत्या कट रचून अमेरिकेतील नागरिकांना गुन्हा दाखल करण्याची व तडजोड न केल्यास अटकेच्या कारवाईची भीती दाखवून त्यांना कोणत्याही दुकानातून हजारो डॉलर किमतीचे गिफ्टकार्ड घेण्यास भाग पाडायचे. गिफ्टकार्डवरील १६ अंकी अकाउंट नंबर जमा करायला सांगायचे. अमेरिकेतील आरोपी साथीदारांच्या बँक खात्यात ती रक्कम लगेच ट्रान्सफर होते. जमा झालेल्या रकमेपैकी काही हिस्सा दहाही आरोपी व फरार आरोपींनी अयोग्य मार्फतीने भारतामध्ये स्वतः प्राप्त करून आर्थिक फायदा मिळविल्याचे दिसून आले आहे.
अटकेतील आरोपींची नावेप्रकाश दीपक बॅनर्जी (३४), जयेश गोपाल पडाया (२४), चंदन यशवंत आमीन (२४), भरत नारायण भाटी (३०), ओमकार नितीन काळे (२०), सनीत सुभाष कपाडे (२०), कोमल तानाजी बघाडे (१९), मुस्कान वाजीद हुसेन (१९), प्रांजल पीयूष शिंदे (२८), चंद्रेश मनोहर विश्राम (२४) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे