गडचिरोली: अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन पेरमीली हदीतील चंद्रा जवळील बांडिया नदीवर पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या दिवानजीकडे ७० लाख रूपयांची मागणी करून त्याचे अपहरण करणाऱ्या १० ताेतया नक्षलवाद्यांना पेरमिली पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दाेन भरमार बंदुका, दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
चैनु कोम्मा आत्राम वय ३९ वर्ष, दानु जोगा आत्राम वय २९ वर्ष दाेघेही रा. आलदंडी, शामराव लखमा वेलादी वय ४५ वर्ष, संजय शंकर वेलादी वय ३९ वर्ष, किशोर लालू सोयाम वय ३४ वर्ष तिघेही रा. चंद्रा, बाजू केये आत्राम वय २८ वर्ष रा. येरमनार टोला, मनिराम बंडू आत्राम वय ४५ वर्ष रा. रापल्ले, जोगा कोरके मडावी वय ५० वर्ष रा. येरमनारटोला, लालसू जोगी तलांडे वय ३० वर्ष रा. येरमनार, बजरंग बंडू मडावी वय ४० वर्ष रा. मल्लमपल्ली ता. अहेरी असे अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.
जी.एस.डी.इंडिस्टीज या कंपनीमार्फत बांडीया नदीवरील पुलाचे काम सुरु आहे. येथे काम करणारे दिवानजी राजेश आत्राम रा. लगाम यांना ११ ऑक्टाेबर राेजी एका अनोळखी इसमाने भारतीय कम्युनिष्ठ पार्टी, माओवादी दक्षिण गडचिरोली डिव्हिजन या लेटरहेडचे पत्र देऊन ७० लाख रूपयांची मागणी केली. ती मागणी मान्य न केल्याने ११ नाव्हेंबर राेजी रात्री ०३.१५ वाजता दोन अनोळखी बंदुकधारी व्यक्तींनी आत्राम यांचे कामाच्या ठिकाणावरून रापल्ले जंगल परीसरात अपहरण केले. बंदुकीचा धाक दाखवुन पुलाचे काम पुर्ण करायचे असेल तर ७० लाख रुपये तीन दिवसांत द्या नाही तर कंपनीच्या साहित्याची जाळपोळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. घटनास्थळी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केलेले १० ते १२ इसम आजुबाजुला उभे होते. ते नक्षलवाद्यांसारखे दिसत होते.
याबाबतची तक्रार दिवानजी आत्राम यांनी १२ नोव्हेंबर रोजी उप पोलीस स्टेशन पेरमीली येथे दाखल केली. त्यावरून आराेपींविराेधात भादंवि कलम ३६४ (अ), ३८७, ३४२, ५०६, ३४ भादंवी ३/२५ भारतीय हत्यार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता यात काही स्थानिक नागरिकांचा सहभाग असल्याचे दिसून आल्याने त्यांना अटक केली.ही कारवाई पोलीस अधिक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनात पेरमिली उप पाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पाेलीस उपनिरिक्षक अजिंक्य जाधव, दिपक सोनुने, रामहरी जांबुळे, रविंद्र बोढे, राहुल खार्डे, महेश दुर्गे, प्रशांत मेश्राम, मधुकर आत्राम, विवेक सिडाम, राकेश उरवेते, ब्रिजेश सिडाम यांच्या पथकाने केले.हे साहित्य केले जप्त
ताेतया नक्षलवाद्यांकडून नक्षल पत्र, एमएच ३३ एल ८८४६, एमएच ३३ एन ३३२५ क्रमांकाच्या दाेन दुचाकी, दोन भरमार बंदुका, दाेन कमांडो हिरवी टि-शर्ट, लोअर पॅन्ट, टाॅर्च, एसएलआरची काळया रंगाची मॅग्झीन, १९ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.