लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक बडनेरा रोडवरील दसरा मैदानासमोरील एका सदनिकेतून तब्बल १० किलो सोने व ५.३९ लाख रुपये रोख रकमेसह एकूण ५ कोटी ५ लाख ३९ हजार ८०० रुपयांचे घबाड जप्त करण्यात आले. घटनास्थळाहून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपी सोन्यासह रोख रकमेचा हिशेब देऊ शकले नाहीत.
पोलिसांनी ५ मार्च रोजी रात्री १० नंतर ही कारवाई केली. एवढे बेहिशेबी सोने पकडण्याची ही पहिलीच कारवाई आहे. याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले आहे. एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये काही संशयास्पद लोक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे धाड घातली.
राजेंद्रसिंह भंवरसिंह राव (३८, रा. सेवाली ता. जि. राजसमंध, राजस्थान), गिरीराज जगदीशचंद्र सोनी (२२, रा. वल्लभनगर, उदयपूर, राजस्थान) व अशोक सत्यनारायण खंडेलवाल (२४, रा. गंगापूर, जि. भिलवाडा, राजस्थान) हे तिघे फ्लॅटमध्ये होते. त्यांना सोन्याच्या दागिन्यांचे बिल, पावत्या व रोख रकमेबाबत विचारले असता, त्यांनी अधिकृत बिल वा पावती नसल्याचे सांगितले. कच्च्या पावत्यांबाबतदेखील ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.