मुंबई : गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी करणारा दहिसर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. पोलीस उप निरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे याच्यासह लाचेच्या रक्कमेपैकी एक लाख स्वीकारणारा खाजगी व्यक्ती गौरव गम शिरोमणी मिश्रा विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या कंपनीच्या नावे असलेले बँक खाते गोठविले असल्याने तक्रारदार यांनी बँकेत जावून चौकशी केली. बँकेतील कर्मचाऱ्यांनी तक्रारदार यांना दहिसर पोलीस ठाणे येथील तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे यांचा मोबाईल क्रमांक देवून अधिक चौकशी करण्याम सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी गुहाडे यांना संपर्क साधताच, त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली असून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी केली. तडजोडीअंती ५ लाख रुपयाची मागणी करताच तक्रारदार यांनी १८ एप्रिल रोजी एसीबी कार्यालयात धाव घेतली.
तक्रारीनुसार, केलेल्या पडताळणीत गुहाडे यांनी तडजोडी अंती ३ लाखाची मागणी करून खासगी व्यक्ती गौरव गम शिरोमणी मिश्रा याच्यामार्फत लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार करण्यात आलेल्या सापळा कारवाईत मिश्रा हा मागणी केलेल्या रक्कमेपैकी १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ मिळून आला. त्यानुसार, दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.