पुणे : देणेकरी कंपन्यांच्या नावाने बनावट खाते उघडून त्यात कंपनीचे पैसे ट्रान्सफर करुन अधिकाऱ्यानेच कंपनीला १० लाख २० हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे़. कोरेगाव पार्क पोलिसांनी या अधिकाऱ्याला अटक केली आहे़. सचिन बंडू गोसावी (वय ३१, रा़ आल्कासा सोसायटी, महंमदवाडी) असे त्याचे नाव आहे़. हा प्रकार फेब्रुवारी ते आॅक्टोंबर २०१८ दरम्यान घडला़. याप्रकरणी विनोद महाडिक (वय३२, रा़ वृंदावन निवास, धानोरी) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, महाडिक हे कोरेगाव पार्क येथील मार्वेल रिएल्टर्स ग्रुप आॅफ कंपनीत व्यवस्थापक आहेत़. त्यांच्या कंपनीत सचिन गोसावी हा बिलिंग एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करीत होता़. त्याने त्याच्याकडे कंपनीने व्यवसायाशी निगडित असलेल्या कंपन्या (वेंडर) यांनी केलेल्या कामाच्या बिलाचे पैसे धनादेश अथवा आरटीजीएसद्वारे पेमेंट करण्याचे काम कंपनीने दिले आहे़. फेबु्रवारी ते आॅक्टोंबर या काळात त्याने कंपनीचे काम करणाऱ्या रॉयल मल्टी सर्व्हिसेस, हेल्दी पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस आणि डी अँड एफ शाईन प्रा.लि़. या तीन वेंडर कंपन्यांच्या नावाने साधना सहकारी बँक, खराडी व कोंढवा येथील शाखेत बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर करुन खाती उघडली़. त्यानंतर सचिन गोसावी याने मुळ कंपन्यांच्या खात्यांवर पैसे जमा न करता त्याने उघडलेल्या बनावट खात्यावर १० लाख २० हजार रुपये जमा केले व ते स्वत:साठी काढून घेतले़. दरम्यान, वेंडर कंपन्यांनी अद्याप पैसे मिळाले नसल्याचे सांगितल्यावर कंपनीने तर पैसे दिले असल्याचे खात्यात दिसून येत होते़. त्यामुळे कंपनीने कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली़. त्याचा तपास करत असताना सचिन गोसावी यानेच बनावट खाती उघडली. असल्याचे व त्यावर पैसे ट्रान्सफर केल्याचे लक्षात आले़. ही खाती त्याने कंपन्यांच्या नावाने उघडली असली तरी त्यासाठी लागणारे काही पुरावे त्याने बनावट कागदपत्रे तयार करुन दिली़. पण हे खाते कोण चालविणार हे दाखविण्यासाठी स्वत:चे आधार कार्ड व अन्य माहिती दिली होती़. त्यावरुन पोलिसांनी तपास करुन त्याला अटक केली आहे़. पोलीस हवालदार दिनेश शिंदे अधिक तपास करीत आहेत़.
कंपनीच्या अधिकाऱ्यानेच घातला १० लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 4:02 PM
देणेकरी कंपन्यांच्या नावाने बनावट खाते उघडून त्यात कंपनीचे पैसे ट्रान्सफर करुन अधिकाऱ्यानेच कंपनीला १० लाख २० हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे़.
ठळक मुद्देस्वत:च्या खात्यात केले पैसे ट्रान्सफर : एकाला अटक हा प्रकार फेब्रुवारी ते आॅक्टोंबर २०१८ दरम्यान