Tamilnadu News: तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मधुरंठकमजवळील चित्रवाडी गावात 10 दिवसांपूर्वी पुरलेल्या 10 वर्षीय मुलीचे शीर बेपत्ता झाले आहे. सहावीत शिकणारी 10 वर्षीय कृतिका 5 ऑक्टोबर रोजी घराबाहेर खेळत होती. यादरम्यान विजेचा खांब पडल्याने ती गंभीर जखमी झाली. नऊ दिवस हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज दिल्यानंतर 14 ऑक्टोबरला कृतिकाचा मृत्यू झाला.
15 ऑक्टोबर रोजी कृतिकावर अंत्यसंस्कार करण्यात आला. सुमारे दहा दिवसांनंतर, तिच्या पालकांना(पांडियन आणि नादिया) मुलीच्या कबरीशी छेडछाड झाल्याचे लक्षात आले. संशयाच्या आधारे मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जिल्हा वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि जिल्हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कबर खोदली.
यावेळी मुलीचे डोके कबरीतून गायब झाल्याचे पाहून तेथे उपस्थित सर्व लोक चक्रावून गेले. चित्तूर पोलीस आता वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. पूर्ववैमनस्यातून मुलीचे शीर कोणीतरी सोबत नेले आहे का किंवा जादूटोण्यामुळे हे काम केले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, खरे कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना घटनास्थळावरून काही वापरलेले हातमोजे आणि टॉर्च सापडली आहे. या वस्तूंच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.