गडचिरोली - एका ११ वर्षीय शाळकरी मुलीला मोटरसायकलवरून शाळेत सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पोलीस हवालदाराला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.जी.मेहरे यांनी आज ठोठावली. प्रमोद देवाजी चापले असे आरोपीचे नाव आहे.गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथील रहिवासी असलेला तत्कालीन पोलीस हवालदार प्रमोद चापले २०१५ मध्ये सिरोंचा पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पीडित मुलीच्या घरी तो नेहमी जात असे. अशातच ३१ मार्च २०१५ रोजी सकाळी त्याने त्या घरातील ११ वर्षीय शाळकरी मुलीला शाळेत सोडून देण्याच्या बहाण्याने आपल्या मोटार सायकलवरून सिरोंचा ते आलापल्ली मार्गावरील सूर्यापल्ली गावाजवळील पुलाखाली नेले आणि तिच्याशी जबरदस्ती केली. यावेळी त्याने त्या बालिकेशी अनैसर्गिक कृत्यही केले. या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास गाडीखाली चिरडून टाकील आणि वडिलांना बंदुकीची गोळी घालून ठार मारेल अशी धमकी त्याने पीडित मुलीला दिली. हा प्रकार उघड झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सिरोंचा ठाण्यात प्रमोद चापलेविरूद्ध भा. दं. वि. कलम ३७६, ३७७, ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार (पॉक्सो) आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. एसडीपीओ डॉ.शिवाजी पवार यांनी प्रकरणाचा तपास केला.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे १२ साक्षदारांचे जबाब नोंदविण्यात आले. तसेच पीडित मुलीचे बयाण, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेऊन सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून विविध कलमान्वये जास्तीत जास्त १० वर्ष सश्रम कारावास आणि एकूण ३५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड.अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम यांनी काम पाहिले.