पुणे - लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली येथे एका कंपनीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेसाठी आलेल्या अकाऊंट एक्झिक्युटीव्ह तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी सुरक्षारक्षकाला १० वर्ष सक्तमजुरी आणि ११हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडाच्या रकमेतील ७ हजार रुपये पिडित तरुणीला देण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा निकाल विशेष न्यायाधीश आर व्ही. अदोने यांनी दिला. अॅम्बी व्हॅलीसारख्या प्रसिद्ध ठिकाणी ही घटना १० डिसेंबर २०१० मध्ये घडली होती़.
धमेंद्रकुमार रामबाबुल चौधरी ऊर्फ सिंग (वय २२ रा. अॅम्बी व्हॅली सिटी, ता. मुळशी, मूळ उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. पिडित तरुणी तिच्या कंपनीच्या वतीने अॅम्बी व्हॅली येथे राष्ट्रीय परिषदेसाठी आली होती. ती तिच्या रुममध्ये झोपलेली असताना आरोपी तिथे गेला. तिला चाकूचा धाक दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला फोन करुन सांगितला होता. त्यानंतर तिने मुंबईला आई - वडिलांकडे गेल्यावर हा प्रकार सांगितला होता.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक १५ साक्षीदार तपासले. फिर्यादी तरुणी, तिची तपासणी केलेले डॉक्टर यांची साक्ष, ओळखपरेड, व्हाईस रेकॉर्डिंग या बाबी महत्वच्या ठरल्या़
आरोपी हा सुरक्षा रक्षक असून त्याचे रक्षण करण्याचे काम असताना त्याने असे कृत्य केले. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची सरकारी वकील पाठक यांनी मागणी केली. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.अॅड. प्रतिभा घोरपडे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपीने तो पकडला जावू नये म्हणून घाबरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर या प्रकरणी ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हाईस रेकॉर्डिंग वरून आरोपीला जाळ्यात
घटनेच्या वेळी आरोपीने तरूणीला दोन शब्द वापरले होते. तो आवाज तिला आठवत होता. त्यावरून पोलिसांनी अॅम्बी व्हॅली येथे काम करणाºया चार कामगारांचे आवाज तिला ऐकविले. त्यावेळी तिने आरोपीचा बरोबर आवाज ओळखला. हा गुन्हा उघडला झाला. पुन्हा त्याचे स्केचिंगही काढण्यात आले होते. तेही तिने ओळखले होते़.
सध्या समाजात दिवसें न दिवस अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसत आहेत. या प्रकरणात रक्षक ज्याच्यावर विश्वास ठेवला जातो. त्यानेच असे कृत्य केले. पीडीत तरुणीला शारिरीक इजा तर झाली़ त्याचबरोबर तिला मानसिक धक्क्यालाही सामोरे जावे लागले जे विसरले जावू शकत नाही. आरोपीने हे कृत्य करताना पीडित तरुणीला केलेल्या इजा पाहता या कृत्याचे गांभीर्य लक्षात येते. बलात्काराच्या घटनेमुळे पीडीतांना मानसिक धक्का बसतो, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.