- मधुकर ठाकूर
उरण : येथील नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड ( जीडीएल ) या कंपनीवर इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (२४) धाड टाकली आहे.सुमारे १०० अधिकारी, कर्मचारीसुरक्षा यंत्रणांसह सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद करून कागदपत्रं व कंपनीच्या आर्थिक उलाढालीची कसुन तपासणी करीत आहेत.
उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड ( जीडीएल ) या कंपनीतुन कंटेनर मालाची मोठ्या प्रमाणावर आयात -निर्यात केली जाते.या कंटेनर यार्डमधून सोने, अमली पदार्थ, रक्तचंदन आणि इतर तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.त्यामुळे हे कंटेनर यार्ड याआधीच डीआरआय, न्हावा- शेवा सीमा शुल्क, पोलिस यंत्रणेच्या रडारवर आहे.तस्करीच्या घटनांमुळे याआधीच सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर असलेल्या कंपनीवर गुरुवारी सकाळी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे.गुरुवारी सकाळी ११ वाजता गुप्तपणे टाकण्यात आलेल्या धाडीत सुरक्षा यंत्रणांसह सुमारे १०० अधिकारी, कर्मचारीसहभागी झाले आहेत.
तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी कंपनीचे गेट बंद केले आहे.कर्मचारी, अधिकाऱ्यांचे फोन स्वीच ऑफ ठेवण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे आतमधील कारवाईची खबरबात लागणे अशक्य होऊन बसले आहे. छाप्याची खबर मिळताच उरण पोलिसांनी इन्कमटॅक्स विभागाचे अधिकारी आणि कंपनीकडून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कारवाई गुप्त असल्याचे सांगत माहिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी माघारी धाडले असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली. या कारवाई प्रकरणात इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही अधिक माहिती मिळते काय याची प्रतीक्षा लागुन राहिली असल्याचे न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी सांगितले.