बुलडाणा: अंशत: अनुदानित यादीनुसार येथील भारत विद्यालयामध्ये ११ विज्ञान शाखेत प्रवेश देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडू गायकवाड यांच्यासह अन्य तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ ऑगस्टला रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे बुलडाण्यातील शैक्षणिक वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडू गायकवाड (५३, रा. सुंदखेड), युथ लिग क्रिएशन सेंटरचे खासगी कर्मचारी तथा वसतिगृह कार्यवाहक गजानन सुखदेव मोरे (३८, रा. बिरसिंगपूर), मजूर असलेले जितेंद्र प्रल्हाद हिवाळे (३६, रा. नांद्राकोळी) आणि लव ट्रस्ट फोर इंडियन चिल्ड्रन इन निड या संस्थचे लिपीक राहुल विष्णू जाधव (३७, रा. देऊळघाट) या चौघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चिखली तालुक्यातील सावरखेड बुद्रुक येथील रहिवाशी आणि सध्या बुलडाण्यातील वावरे ले-आऊटमध्ये राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गजानन मोरे याच्या माध्यमातून तक्रारकर्त्याकडे शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांनी त्यांच्या मुलाच्या ११ वी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी १५ हजार रुपयांची लाच मागतील होती. तडजोडीअंती ती दहा हजार रुपये करण्यात आली. यासंदर्भात २८ जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्यक्ष पडताळणी केली होती. त्यानंतर २९ जुलै आमि ३ ऑगस्टला प्रत्यक्ष सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ३ ऑगस्टला भारत विद्यालयातील मुख्याध्यापकांच्या कार्यलयाच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत गजानन मोरे याच्या माध्यमातून मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांनी ही दहा हजार रुपायंची रक्कम स्वीकारली. लाच देण्यासाठी जितेंद्र हिवाळे यांनी तक्रारकर्त्यास केेले हाेते तर लाचेची रक्कम मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्या सांगण्यावर प्रकरणातील चौथा आरोपी राहुल जाधव याने स्वीकारली असल्याचे एसीबीच्या कारवाईदरम्यान समोर आले.
कारवाईत यांचा होता सहभागया कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भांगे, पोलीस हेडकॉन्सेटबल विलास साखरे, राजू क्षीरसागर, मोहम्मद रिजवान, विनोद लोखंडे, जगदीश पवार, अ. काझी, स्वाती वाणी यांनी सहभाग घेतला होता. शैक्षणिक वर्तुळात गेल्या काही वर्षांत करण्यात आलेली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही एक मोठी कारवाई आहे.