अमरावती: नागपूरलगतच्या गोरेवाडा जंगलात १५६ जीवंत काडतुसे आढळल्याची घटना ताजी असताना अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १०२ खंजीर, चायना चाकू व दोन देशी कट्टे असा प्रचंड मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. शहर पोलिसांच्या क्राईम युनिट दोनने १० डिसेंबर रोजी ही दमदार कारवाई केली.
याप्रकरणी टोळीप्रमुखांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अलिमनगर ते लालखडी रोडवर ९ डिसेंबर रोजी काहीजण चाकूसारखे खंजीर हातात घेऊन दहशत माजवत असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. अटक आरोपींमध्ये अब्दुल सोहेल अब्दुल शफी (१९, रा. गुलिस्ता नगर), टोळी प्रमुख अकरम खान उर्फ गुड्डू वल्द बादुल्ला खान (१९, रा. अलिम नगर, कब्रस्तान रोड) याच्यासह फरदीन खान युसूफ खान (२१, राहुल नगर), मुजम्मिल खान जफर खान (२१, रा. गुलिस्ता नगर), शेख सुफियान मोहम्मद अशफाक (१९, रा. यास्मीन नगर) व जाहेद शहा हमीद शहा (२०, लालखडी) यांचा समावेश आहे. सहाही जण अमरावतीतील रहिवासी आहेत. आपण ती शस्त्रे मुंबईहून मागवून शहरातील गुन्हेगारांना त्या अवैध शस्त्रांचा पुरवठा करत असल्याची कबुली त्या सहा जणांनी दिली आहे. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात क्राईम युनिट दोनचे प्रमुख तथा पोलिस निरीक्षक राहुुलकुमार आठवले यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून आणखी शस्त्रे जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.