मुंबई : मस्जिद बंदर येथून २ कोटी ४० लाख किमतीचा ८ किलो चरस साठा घेऊन आलेल्या मुंब्य्राच्या ड्रग्ज तस्कराला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तो दहावी पास असून, नुकतेच वाईन शॉपची सेल्समनची नोकरी सोडून ड्रग्ज तस्करीत सक्रिय झाल्याचे कारवाईत समोर आले.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने ही कारवाई केली आहे. एएनसीचे पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव, वरळी कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल कदम व पथकाने ही कारवाई केली. युसूफ मेहर अली रोड, मस्जिद बंदर येथे एकजण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला.
पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ८ किलो चरसचा साठा मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत २ कोटी ४० लाख एवढी आहे. यावर्षी आतापर्यंतच्या कारवाईत एएनसीने १९५ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. अटक केलेला आरोपी मुंब्रा परिसरात पत्नी आणि मुलासोबत राहतो. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून नुकतीच वाईन शॉपची सेल्समनची नोकरी सोडून तो यामध्ये गुंतल्याचे समोर आले.
मुंब्रा येथून आणलेले चरस मुंबईत ड्रग्ज पेडलरला विक्रीसाठी आणले होते. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने हा साठा कुणाकडून व कसा मिळवला, याचा शोध एएनसीकडून घेण्यात येत आहे.