मुंबई - बांग्लादेशमधून भारतात वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुलींची सर्रास तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ग्रॅन्ट रोड येथून १६ मुलींची सुटका केली असून यातील ११ मुली बांग्लादेशी आहेत. पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला बेड्या ठोकल्या आहे.
बांग्लादेशमधील गरीब कुटुंबातील एका तरुणीला मुंबईत चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवत भारतात घेऊन येण्यात आलं होतं. काही दिवस त्या मुलीला दलालांनी नवी मुंबईत ठेवलं होतं. दरम्यान, त्या मुलीला दलालांनी ग्रॅन्ट रोड येथील कुंटणखान्यात आणलं. त्या मुलीची कुंटणखान्यात विक्री करून दलाल निघून गेले. त्यानंतर कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेने तिला वेश्या व्यवसाय करण्यास जबरदस्ती केली. तिने त्यास विरोध दर्शवला असता तिला मारहाण करून डांबून ठेवण्यात आलं. या मुलीची माहिती अज्ञात व्यक्तींनी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला दिली. त्यानंतर पोलिसांनी या कुंटणखान्यावर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी त्या कुंटणखान्यातून १६ मुलींची सुटका केली. त्यापैकी ११ मुली या बांग्लादेशी असल्याचं उघड झालं. या प्रकरणी पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक केली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.