लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : औरंगाबाद रोडवरील मिर्ची चौकात शनिवारी झालेल्या लक्झरी बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी नऊजणांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत, तर एका मृतदेहावर कुटुंबीयांच्यावतीने नाशिकमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या अपघातात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यापैकी अकरा जणांचीच ओळख पटू शकली. गजानन शालीग्राम लोणकर (रा. आसेगाव ता. रिसोड जि. वाशीम) असे अकराव्या मृताचे नाव आहे.
शनिवारी पहाटे पाच वाजता ट्रक आणि लक्झरी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर बसने पेट घेतल्याने यामध्ये बसमधील १२ जणांचा होरपळून अक्षरश: कोळसा झाला. वाशिम जिल्ह्यातील मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्याने कुटुंबीयांनी नाशिकमध्येच अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविल्याने प्रशासनाच्या सहकार्याने अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यानुसार त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासाला गती दिली जात असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दहाजणांचीच ओळख पटू शकली.
वाशिमच्या मृतांचा आकडा पाचवरबस अपघातातील वाशिमच्या आणखी तीन मृतांची ओळख पटली आहे. वैभव वामन भिलंग (रा. तरोडी), साहिल जितेंद्र चंद्रशेखर (रा. सावळी, ता. मालेगाव), अशोक सोपान बनसोड (रा. बेलखेडा, ता. रिसोड) या तीन मृतांची ओळख पटली.