मुंबई : न्हावा-शेवा बंदरातून विदेशी महागड्या सिगारेटची तस्करी करणाऱ्या आरोपींना महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून ११ कोटी ८८ लाख रुपये किमतीच्या विदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.
खजुराच्या नावावर या महागड्या नामांकित विदेशी सिगारेट आणण्यात आल्या आहेत. न्हावा-शेवा बंदरात आलेल्या कंटेनरमधून ही तस्करी करण्यात आली. ३२ हजार ६४० बॉक्समधून ७१ लाख ६१ हजार ६०० सिगारेट आणण्यात आल्या. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये विदेशी सिगारेट सहजासहजी उपलब्ध नसल्याने चढ्या दराने त्याची विक्री केली जात होती. डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी या माहितीला दुजोरा दिला.या प्रकरणी मनिष शर्मा (३१) आणि सुनील वाघमारे (२९) या दोन आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली. हे आरोपी चेंबूर येथील आहेत. शर्मा हा आरोपी वाघमारेकडून विजेचे बिल, पॅनकार्ड अशी कागदपत्रे घेऊन त्याच्या साहाय्याने बनावट कंपन्यांसाठी जीएसटी व आयात निर्यात क्रमांक मिळवून देत असल्याचे तपासात समोर आले आहे. अटक आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.