मुंबई - शीव परिसरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ११ लाख ८५ हजारांची रक्कम जप्त केली आहे. जप्त केलेली रक्कम ही बेहिशेबी असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने 10 मार्च ते आतापर्यंत राज्यभरातून तब्बल करोडो रुपये काळा पैसा जप्त केला आहे.
मुंबईत २९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि दारूची मोठ्या प्रमाणावर बेकादेशीर वाहतूक होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे मुंबईसह देशभरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांची काळ्या पैशांवर, अवैध गोष्टींवर बारिक नजर आहे.
बुधवार रात्री सुमारास सायन कोळीवाडा परिसरात विधानसभा मतदारसंघातील संजय नारायन वारंग यांच्या क्र.3 या फिरत्या तपासणी पथकाने सायन हॉस्पीटल जवळील सिग्नलवर पाहणी करीत असताना, त्यांनी लाल रंगाच्या रेनॉल्ट डस्टर या मोटार कारची (एम.एच.47 ए.बी.6559) तपासणी केली. गाडीमध्ये दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह व अनुराग कुमार शाह हे तीन इसम होते. त्याच्याकडे 11 लाख 85 हजार रुपये रक्कम आढळून आली.
याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असुन आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत. अशी माहिती 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.