ठाणे : भिवंडीतून एक कोटी ९ लाखांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करत सहा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असताना, पुन्हा एकदा भिवंडीतून ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने ( एफडीए) गुरुवारी २४ नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत सुमारे ११ लाखांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करत, ज्या गाड्यांमध्ये हा साठा खाली करून भरला जात होता. त्यांची नोंदणी आणि वाहन चालकांचा लायसन्स रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती कोकण विभागाचे ( अन्न) सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.
भिवंडीतील ग्लोब कॉम्प्लेक्सच्या बाजूला रोडवर, दापोड रोड, वळगाव, ओवाळी गावात हा प्रतिबंधित अन्नपदार्थ एका गाडीतून दुसऱ्या गाडीत भरणार असल्याची माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसारच सापळा रचला असताना, हा प्रतिबंधित पदार्थ भरताना ठाणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव यांच्या निर्दशनास आढळून आले. त्या वाहनातून प्रतिबंधित अन्नपदार्थात एसएचके गुटखा, बाराती पान मसाला, बाराती सुगंधी चघळण्याची तंबाखू यांचा सुमारे रुपये १० लाख ९६ हजार ५१२ किमतीचा साठा आढळून आला. त्या साठ्यासह दोन्ही वाहने ताब्यात घेतली.
तसेच, हिमतसिंग मोखसिंग, राजकुमार रामाश्री खरवर, नारायण माधव टोपे तसेच एका अनोळखी वाहनचालक अशा चौघांविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात २४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. तर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे वाहतूक केल्याप्रकरणी या प्रकरणातील दोन्ही वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र तसेच दोन्ही वाहनचालकाचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे एफडीएने सांगितले.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या सूचनेनुसा कोकण विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी, माणिक जाधव, अन्न सुरक्षा अधिकारी उत्तरेश्वर बडे व सहायक आयुक्त (अन्न) रामलिंग बोडके यांच्या उपस्थित करण्यात आली.