लातूर : शहर व परिसरातून चोरीला गेलेल्या तब्बल ११ दुचाकी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपास करून जप्त केल्याची घटना घडली. यातून पाच गुन्हे उघडकीस आले असून दुचाकी चोरी करणाऱ्या एका युवकास अटकही केली आहे. त्याच्याकडून ३ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात पथकाने विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले ५ गुन्हे उघडकीस आणले. पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीमधील एक्टिवा गाडी विकण्यासाठी एक इसम कुर्डूवाडी, जि. सोलापूर येथील एका विश्रामगृह परिसरात येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथक तत्काळ कुर्डूवाडी येथील विश्रामग्रह परिसरात पोहचून तेथे सापळा लावला.
काही वेळातच एक इसम गाडी वरून येत असताना दिसला. पथकातील पोलिसांनी त्या गाडीच्या चालकास थांबून त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली. यावेळी त्याने मी रोहित सुभाष अलगुडे (रा. वडारवस्ती, खाडगाव रोड, लातूर) येथील रहिवासी असून सध्या भैय्याचे रान, भीमनगर, कुर्डूवाडी येथे राहत असल्याचे सांगितले. गाडी लातूरमधून चोरी केल्याचे त्याने कबूल केले.
कुर्डुवाडीतून घेतले आरोपीस ताब्यात...
लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखीन मोटरसायकली चोरी केल्याचे सांगून चोरी केलेल्या मोटरसायकली कुर्डूवाडी येथील घराच्या समोरील मोकळ्या जागेत ठेवलेल्या असल्याचे सांगितले. त्यावरून सदर पथकाने त्याठिकाणी जाऊन त्या मोटरसायकली ताब्यात घेऊन त्याचे चेसिस व इंजिन नंबरवरून पडताळणी केली असता सदरच्या मोटरसायकली लातूरमधून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. आरोपी राेहित अलगुडे यास शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे. पथकात सहाय्यक फौजदार संजू भोसले, संपत फड, चंद्रकांत डांगे, बंटी गायकवाड, सिध्देश्वर जाधव, प्रदीप चोपणे यांचा समावेश होता.