नवी मुंबई : विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूमधील ११ तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणांकडून ३४ लाख रुपये घेऊन त्यांना नोकरीऐवजी टुरिस्ट व्हिसावर दुबईला पाठविण्यात आले होते. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेककुमार व रितू विवेककुमार अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी सीवूड स्टेशनसमोरील मॉलमध्ये व्हीआरव्ही मेरीटाइम प्रा. लि. नावाने कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून विदेशात नोकरी लावण्याचे काम केले जात होते.उलवेमधील सेथील कुमारन यांनी जुलै २०१८ मध्ये नोकरीसाठी या कंपनीकडे अर्ज केला होता. त्यांचे वय ४० पेक्षा जास्त असल्याने त्यांना नोकरी नाकारली. परंतु त्यांच्या परिचितांपैकी कोणी मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्यांना नोकरी मिळवू देऊ व प्रत्येक उमेदवारासाठी २० हजार रुपये कमिशन देऊ, असे आश्वासन दिले होते. सेथील कुमारन यांनी तामिळनाडूमधील ११ तरुणांना या कंपनीकडे अर्ज करण्यास सांगितले. प्रत्येकाकडून प्रत्येकी ३ लाख ६० हजार रुपये संबंधित कंपनीत भरण्यात आले. सर्व उमेदवारांना दुबई, अरब अमिराती, उझबेकिस्तानमध्ये नोकरी देण्यासाठी करार करण्यात आला. मार्च २०१९ मध्ये त्यांना टुरिस्ट व्हिसा देऊन दुबईमध्ये पाठविण्यात आले. २० दिवसांत व्हिसाची मुदत संपल्याने हे सर्व तरुण तेथे अडकून पडले होते.
फसवणूक झालेल्या तरुणांनी सेथील कुमारन यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. दुबईला जाऊन या मुलांच्या जेवणाचा व राहण्याचा खर्च भागविला व एप्रिल २०१९ मध्ये त्यांना घेऊन पुन्हा भारतात आले. यानंतर व्हीआरव्ही कंपनीच्या संचालकांनी नोकरी मिळवून देण्याचे आमिष सुरूच ठेवले. नोकरीही मिळत नाही व पैसेही मिळत नसल्याने याविषयी फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी नवी मुंबई गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार केली होती. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.