मुंबई : लग्नाच्या बस्त्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दादर येथील भरतक्षेत्र साडीच्या दुकानासह पाच ठिकाणी बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. ऐन लग्नसराईच्या काळात साडीच्या दुकानावर थेट ईडीने छापे टाकल्याचे वृत्त पसरताच खळबळ उडाली.
एका विकासकाची ११३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भरतक्षेत्र दुकानाचे मालक मनसुख गाला व त्यांच्या सीएविरोधात २०१९ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार आली होती. त्याच प्रकरणात ईडीने भरतक्षेत्र दुकानासह, त्यांचा सीए व भागीदार यांच्या निवासस्थानी छापे टाकले. संबंधित विकासकाने २००६ मध्ये बांधकाम कंपनी सुरू केली होती. एका प्रकल्पादरम्यान भांडवलाची गरज निर्माण झाल्याने त्याची गाला यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र गाला यांनी फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी केल्याने हे छापे टाकण्यात आले.
बनावट सहीचा केला वापरसीएच्या मदतीने गाला यांनी संबंधित विकासकाची बनावट डिजिटल स्वाक्षरी वापरत व बनावट कागदपत्रांचा वापर करत त्या विकासकाची कंपनीमधील ५० टक्क्यांची हिस्सेदारी कमी करत २५ टक्के केली व तशी कागदपत्रे कंपनी निबंधकाकडे सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही माहिती समजल्यानंतर व या प्रकरणी आपले ११३ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा करत त्या विकासकाने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. याच आधारे ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. गेल्या चार दिवसांपासून ईडीचे अधिकारी या मालकांची चौकशी करत होते. मात्र बुधवारी त्यांनी थेट दुकानावर छापेमारी केली. सुमारे चार तास ईडीचे अधिकारी या दुकानात होते व त्यांनी अनेक कागदपत्रे तपासली आणि काही कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक डेटा ताब्यात घेतल्याची माहिती आहे.