चंद्रपूर येथील जिवती तालुक्यातील १२ किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी घडली. जिवती पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली. सापळा रचून १२ आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. सुग्रीव शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोटंबे, दादाराव कोटंबे, बालाजी कांबळे, अमोल शिंदे, गोविंद येरेकर, केशव कांबळे आणि सुरज कांबळे अशी या आरोपींची नावे आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार संतोष अंबिके यांनी फरार आरोपी रात्री गावात झोपण्यास येतील या दृष्टीने पाळत ठेवली होती. त्यावेळी सापळा रचून त्यांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींमध्ये तीन महिला आहे. त्यांच्या अंगात येत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. दंगा प्रकरणी भादंवि कलम 143, 147, 325, 325,143,147, 149, 342 आणि जादूटोणा विरोधी कायदा कलम 3 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या १२ आरोपींना आता न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती बघितली. गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे. गावातील लोक काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी आल्या आणि त्यांनी दलित समाजातील वयाने ज्येष्ठ आठ-दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी भानामती केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात खांबांना बांधून बेदम मारहाण केली. वृद्ध, महिलांनाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक मूक दर्शक बनले होते. भीतीने कुणीही मध्ये पडले नाही. यात ७ जण जखमी झाले. त्यांना जिवती ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर दोघांना घरी पाठवण्यात आले, तर पाच गंभीर जखमींना चंद्रपूरला हलविण्यात आले.