लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी, भुसावळ, औरंगाबाद, मुंबई, अकोला व पुणे येथे एकाच वेळी १५ पथकांनी धाड टाकली. या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे न्यायालयाने पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांचे पथक जळगावात दाखल झाले. जळगाव जिल्ह्यात १०, तर इतर ठिकाणी बाहेर ५ अशा पथकांनी एकाच वेळी धाड टाकत अनेकांना अटक केली. भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करतानाच सहा वाजता ताब्यात घेतले, तर प्रेम कोगटा यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.
काय आहे प्रकरण?पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. २६ नोव्हेंबर रोजी १३५ जणांचे पथक जळगावात दाखल झाले होते. आता पुन्हा पुणे पोलिसांची ५० जणांची १० पथके दुसऱ्यांदा जळगावात आली. दिवसभर अटक, पंचनामा व इतर प्रक्रिया करून सायंकाळी पुण्याकडे रवाना झाली.
ठेवीदारांच्या पावत्यांमध्ये समायोजित केली कर्जअटक केलेल्या सर्व जणांनी बीएचआर पतसंस्थेतून मोठमोठी कर्ज घेतली आहेत. कर्जाची परतफेड करताना ठेवीदारांच्या पावत्यांमध्ये नियमबाह्य कर्जाची रक्कम समायोजित केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
सहकार क्षेत्रात खळबळमानकापे यांनी सहकाराच्या माध्यमातून मोठे साम्राज्य उभे केले आहे. विविध संस्थांचे ते संस्थापक आहेत. आदर्श महिला नागरी सहकारी बँक, आदर्श पतसंस्था शिवाय आदर्श दूध डेअरी, आदर्श इंग्लिश स्कूल, आदर्श रुग्णालय तसेच एका वर्तमानपत्राचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या अटकेने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.
अटक केलेले सर्व संशयित बलाढ्य कर्जदार आहेत. त्यांनी ठेवीदारांच्या पावत्या घेऊन त्यात स्वत:चे कर्ज नियमबाह्य समायोजित केली आहेत. त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. - भाग्यश्री नवटके, उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे
अटक करण्यात आलेल्यांची नावेछगन झाल्टे (जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक), भागवत गणपत भंगाळे (सराफ तथा हॉटेल व्यावसायिक), प्रेम रामनारायण कोगटा (दालमिल असोसिएशन), राजेश लोढा (कापूस व्यापारी), आसीफ मुन्ना तेली (माजी उपनगराध्यक्षांचा मुलगा), जयश्री शैलेश मणियार, संजय भगवानदास तोतला, जितेंद्र रमेश पाटील, प्रीतेश चंपालाल जैन, अंबादास आबाजी मानकापे, जयश्री अंतिम तोतला, प्रमोद किसनराव कापसे