मुंबई : ॲपआधारित मोबाइल गेम्स सेवा देण्याचा दावा करणाऱ्या ई-नगेट्स या कंपनीच्या संचालकांच्या घरी ईडीने शनिवारी टाकलेल्या छाप्यांत संचालकाने पलंगामध्ये १२ कोटींची रोकड दडविल्याचे आढळले. ही सर्व बेहिशेबी रक्कम असून ईडीच्या अधिकाऱ्यांनी ती जप्त केली आहे.
या संचालकाच्या अन्य सहा मालमत्तांवरही आता छापेमारी सुरू
ई-नगेटस् कंपनीचा संचालक आमीर खानने ॲपच्या माध्यमातून मोबाइल गेम्स सेवा सुरु केली होती. यात एक पेमेंट वॉलेट तयार केले होते. यात पैसे भरून लोकांना गेम्स खेळता येत असत. गेम खेळायचा नसेल आणि त्या वॉलेटमध्ये पैसे शिल्लक असतील तर ते पैसे पुन्हा काढून घेता येत असत. गेम जिंकणाऱ्या लोकांना बक्षिसापोटी पैसे देण्यात यायचे. गेम अन्य लोकांना पोहोचविल्याबद्दल ग्राहकाला कमिशन दिले जाई. एक वर्षभर हे व्यवस्थित सुरू होते. लाखो लोकांनी मोठ्या रकमा या ॲपच्या पेमेंट वॉलेटमध्ये भरल्या. गेल्या वर्षभरापासून या ॲपच्या वॉलेटमधून शिल्लक रक्कम काढून घेणे ग्राहकांना शक्य होत नव्हते. कंपनीकडून ॲपचा मेंटेनन्स सुरू आहे, वगैरे अनेक कारणे दिली जात होती. कंपनीच्या मालकाने १२ कोटींची रोकड पलंगामध्ये दडवून ठेवली होती.