अमरावती : ऑटोमेटिक पिस्टल व १२ राऊंड जिवंत काडतूस विकण्यासाठी आलेल्या एका कुख्यात आरोपीला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पेट्रोलिंगदरम्यान वलगाव मार्गावरून अटक केली.सैयद वसीम सैयद नूर (३०, रा. फरीदनगर, वलगाव रोड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल (कट्टा), ऑटोमॅटिक मॅगझिन, १२ पिस्टल राऊड (९ एमएम), दुचाकी, मोबाईल असा एकूण १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी आरोपी सैयद वसीमला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कलम ३/२५, ७/२५ आर्म्स ॲक्टनुसार व सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीने हे पिस्टल कुणाकडून आणले आणि ते कुणाला विकणार होता, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.सैयद वसीमजवळून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील क्रमांकाची पोलिसांनी तपासणी केली. त्याने पिस्टल विक्रीसंदर्भात कुणालाही कॉल केले नसल्याचे आढळून आले आहे. आरोपीने अन्य कुठल्या क्रमांकावरून कॉल केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर व पथकाने केली.