बंगळूर : हुबळी येथे पोलीस ठाणं आणि विविध सार्वजनिक इमारतींवर दगडफेक करून सात वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी हुबळी पोलिसांनी ४० जणांना अटक केली आहे. या दगडफेकीत १२ पोलीस जखमी झाले असून त्यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुबळीतील आनंद नगर येथील रहिवासी अभिषेक हिरेमठ या आरोपीने सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा जुन्या हुबळी पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं सुरू झाली. आरोपींनी भगवा ध्वज असलेल्या मशिदीचा फोटो पोस्ट केला होता. त्यांनतर जुने हुबळी परिसरात मोठ्या प्रमाणात निषेध झाला होता.
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एका मुस्लिम संघटनेने जुन्या हुबळी ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी हिरेमठ याला अटक केली. तसेच इतर आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी करत शेकडो लोक पोलीस ठाण्यासमोर जमा होऊ लागले आणि निदर्शन करू लागले. नंतर पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी पोलीस ठाणे, वाहने, रुग्णालय आणि मंदिरावर जोरदार दगडफेक केली. अटक केलेल्यांचे पालक आणि नातेवाईकांनी एकत्र येऊन पोलिसांशी वाद घातल्यानंतर जुन्या हुबळी पोलीस ठाण्यासमोर तणाव निर्माण झाला. अटक करण्यात आलेल्या सर्व ४० जणांना आता विविध ठिकाणी हलवण्यात आले आहे.
हुबळीचे पोलीस आयुक्त लभू राम यांनी या घटनेचा तपास सुरू आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड कसे जमा झाले याचाही आम्ही तपास करत आहोत. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे. खासगी वाहनांचे नुकसान आणि जनतेला दुखापत झाल्याचीही बातमी आहे. काही तक्रारी असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असे सांगितले. पुढे लभू राम म्हणाले की, संपूर्ण हुबळी शहरात प्रतिबंधात्मक आदेश वाढविण्यात आले आहेत आणि इतर जिल्ह्यांमधून अतिरिक्त पोलिसांची कुमक सुरक्षेसाठी आली आहे.