नवी दिल्ली: देशाच्या राजधानीत २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. बलात्काराला विरोध करणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर हल्ला करण्यात आला आहे. मुलीला कात्रीनं वारंवार भोसकण्यात आल्यानं तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. दिल्लीतल्या पश्चिम विहारमधील पीरा गरही परिसरात गुरुवारी धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला. त्याला तिनं विरोध केला. त्यामुळे बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीनं तिच्यावर कात्रीनं हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.पोलिसांना आरोपीच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या आहेत. त्यातून अल्पवयीन मुलीनं बलात्काराला विरोध केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमली पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. त्याला आधी इतर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. तो तुरुंगातही गेला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेऊन आणि जवळपास १०० जणांची चौकशी केल्यानंतर आरोपीला अटक केली. मात्र पोलिसांनी त्याची ओळख सांगितलेली नाही.आरोपी चोरीच्या उद्देशानं घरात शिरला होता. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. घरात शिरल्यानंतर त्याला अल्पवयीन मुलगी दिसली. त्यानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिनं प्रतिकार केला. त्यावेळी आरोपीनं तिच्यावर कात्रीनं हल्ला केला. त्यानं अनेकदा तिला कात्रीनं भोसकलं. त्यामुळे मुलीच्या गुप्तांगाला आणि आतड्यांना गंभीर इजा झाली. तिच्यावर डोक्याला फ्रॅक्चरदेखील झालं. बेशुद्ध होईपर्यंत मुलीनं प्रतिकार केला
निर्भयाची पुनरावृत्ती! बलात्काराला विरोध केल्यानं मुलीला कात्रीनं भोसकलं; गुप्तांग, आतड्यांना गंभीर इजा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 4:01 PM