मीरारोड - १२ वर्ष घरकाम करता करता मालकिणीच्या घरातून पैसे, चांदिच्या वस्तु आदी तब्बल २० लाख रुपयांची चोरी घरकाम करणाऱ्या महिलेने केली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवघर पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. घरकाम करणारी अपर्णा पवार (वय - ४६) या महिलेला अटक केली आहे. एकाच ठिकाणी काम करणाऱ्या व सतराशे रुपये पगार मिळणाऱ्या आरोपी महिलेकडून दागदागिने, रोख रक्कम, एफडी मिळून तब्बल २० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
भार्इंदर पूर्व येथील नवघर मार्गावरील भाईदया ही जुनी इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ममता विष्णु चांगोलीवाला या राहतात. त्या गृहिणी असून त्यांच्या पतीचा कपड्यांचा व्यवसाय आहे. तर मुलगी कॉल सेंटरमध्ये काम करते. त्यांना एका सदनिकेचे भाडे सुद्धा त्यांना मिळते. आलेले पैसे वा खरेदी केलेली चांदी हे कपाटात ठेवताना त्याची नेमकी किंमत वा संख्या नोंद करुन ठेवत नसत. चांगोलीवाला यांच्या घरी गेल्या १२ वर्षांपासून त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारी अपर्णा भरत पवार ही घरकाम करत होती. शेजारीच राहणारी आणि इतक्या वर्षांपासून काम करणाऱ्या अपर्णाने देखील चांगोलीवाला कुटुंबियांचा विश्वास संपादन केला होता. दरम्यान, त्यांच्या घरातुन रोख रक्कम व चांदीची बिस्कीटे चोरीला जात होती. पण त्याचा रेकॉर्ड ठेवत नसल्याने त्यांना ते लक्षात येत नव्हतं. चोरीचा वाढता प्रकार पाहून व एकुणच त्यांनी अंदाजे हिशोब लावला असता तब्बल २० लाख रुपयांची चांदी व रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरीच्या रक्कमेचा विचार करुनच त्यांना धक्का बसला. अखेर ममता यांनी नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलीसांनी गुन्हा दाखल करुन सहाय्यकअधिक्षक अतुल कुलकर्णी व वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक टिकाराम थाटकर, उपनिरीक्षक महेश कुचेकर व महिला पोलीस सुरेखा कुसाळकर यांनी तपास सुरु केला. चांगोलीवाला कुटुंबियांना घरकाम करणारया अपर्णावर जराही संशय नव्हता. परंतु पोलीसांनी अपर्णाची माहिती घेण्यास सुरवात केली. वन रुम किचनच्या खोलीत अपर्णा, तिचा पती व मुलगी तसेच दिराचे कुटुंब राहते. तिचा पती मद्यपी असून कामधंदा करत नाही. तर अपर्ण सुध्दा फक्त चांगोलीवाला यांच्याच घरी काम करते. तरी तिची घर चालवताना चणचण होत नसल्याचे व तिच्या एकूणच राहणीमानावरुन दिसत नसल्याचे पोलीसांनी हेरले. तिला ताब्यात घेऊन तिच्या घराची झडती घेतली असता तब्बल ३ लाख ४७ हजार ७०० रुपयांची रोकड व नव्याने केलेले सुमारे ६ लाख किमतीचे २२ तोळे सोने सापडले. शिवाय बँकेत ५ लाख ३३ हजार रुपये तर फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवलेले ६ लाख रुपये आढळून आले. अपर्णाकडे मिळालेले हे घबाड पाहून चांगोलीवाला कुटुंब व पोलीस सुध्दा थक्क झाले. गुरुवारी अपर्णाला अटक केली असून ४ सप्टेंबरपर्यंत तिला पोलीस कोठडी मिळाली आहे. गेल्या ४ - ५ वर्षांपासून आपण रोख व चांदी चोरत होतो. त्या पैशातूनच सोन्याचे दागिने बनवल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे.