मथुरा : मथुरामध्ये बुधवारी एका व्यापाऱ्याचा त्याच्या पत्नी, मुलीसह मृतदेह एक्स्प्रेस वेवर कारमध्ये सापडला होता. व्यापारी नीरज अग्रवाल यांनीच पत्नी आणि मुलीला आधी गोळी मारली आणि नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. नोटाबंदीवेळी त्यांनी 123 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे धक्कादायक कारण समोर येत आहे.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या नोटाबंदीवेळी नीरज यांनी वेगवेगळ्या प्रकारांनी 123 कोटी रुपयांची अफरातफर केली होती. यामुळे त्यांच्याविरोधात आयकर विभाग, कमर्शिअल टॅक्स आणि अन्य विभागांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांना ही आत्महत्या वाटत असली तरीही त्यांच्या नातेवाईकांना हत्या असल्याचे वाटत आहे.
2018 मध्ये आयकर विभागाने नीरज यांच्या आरएस बुलियन आणि ज्वेलर्सवर छापा टाकला होता. यावेळी नोटाबंदीच्या काळात त्याने वेगवेगळ्या खात्यांमध्ये 123 रुपये भरले होते. हा पैसा त्याने अनेक काळेधन असललेल्या व्यक्तींकडून कमिशनवर व्हाईट करून देण्याच्या बोलीवर घेतला होता. तसेच या व्यक्तींना त्याने सोने खरेदी केल्याची पावत्या दिल्या होत्या. हे सोने त्यांने मुंबईतील एका व्हॅनिटी ज्वेलरकडून खरेदी केल्याचे दाखविले होते. मात्र, चौकशीवेळी हा ज्वेलर 2012 मध्येच बंद झाल्याचे पुढे आले होते.
नीरजच्या वडिलांनी सांगितले की, नीरजवर दोन वर्षांपूर्वीही हल्ला झाला होता. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात तो वाचला होता.