फरिदाबाद - कॉलेजमध्ये उशीरा पोहचला म्हणून १२ वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने दिलेली शिक्षा पाहून तुमचाही संताप अनावर होईल. १० मिनिटे लेट झाला म्हणून विद्यार्थी सध्या मृत्यूशी संघर्ष करत आहे. हा विद्यार्थी ३ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. तो व्हेंटिलेटरवर आहे. पालकांच्या तक्रारीनंतर बुधवारी या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास सुरू झाला आहे.
या घटनेबाबत कुटुंबातील सदस्य उमाकांत यादव यांनी सांगितले की, माझा छोटा भाऊ दिवाकरचे ३ मुले आहेत. एक भाऊ यूपीत राहतो तर २ मुले त्याच्यासोबत दिल्लीत राहतात. मुलगा अपूर्व यादव हा फरिदाबाद सेक्टर ११ मधील डीपीएस येथे १२ वीच्या वर्गात शिकतो. १७ ऑक्टोबरला अपूर्वला कॉलेजमध्ये जायला लेट झाला. त्यामुळे शिक्षक लोकेश यांनी अपूर्वला मारहाण केली.
घरी परतल्यानंतर अपूर्वची तब्येत बिघडली. १ नोव्हेंबरपर्यंत तो कॉलेजमध्ये गेला नाही. २ नोव्हेंबरला कॉलेजमध्ये पोहचण्यास १० मिनिटे उशीर झाला म्हणून पुन्हा शिक्षक लोकेशनं त्याला मारहाण केली. या मारहाणीनंतर अपूर्वची तब्येत आणखी खराब झाली. घरी परतल्यानंतर तो बेशुद्ध पडला. ३ नोव्हेंबरला तो कॉलेजमध्ये जाण्यास नकार देऊ लागला. त्यावेळी मोठ्या भावाने विचारणा केली असता त्याला मारहाण केल्याचं कळालं.
अपूर्वची तब्येत बिघडल्याने तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांनी म्हटलं की, शिक्षक लोकेशच्या मारहाणीमुळे अपूर्व यादवच्या मेंदूतील नस ब्लॉक झाली. उपचारासाठी त्याला व्हेंटिलेटवर ठेवले आहे. १ आठवडा झाला तरी त्याला अजून शुद्ध आली नाही. त्यानंतर नातेवाईकांनी या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली आहे. शिक्षकाला केले निलंबित
कॉलेजचे प्राचार्य मनिष वाधवा यांनी सांगितले की, १७ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत मुलगा कॉलेजमध्ये आला होता. त्यादिवशी कॉलेजमध्ये काय घडलं नाही. विद्यार्थ्याच्या मित्रांशी आणि स्टाफशी विचारणा केली आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा तपास होत नाही तोवर शिक्षक लोकेश यांना निलंबित केले आहे. त्याचसोबत कॉलेजमधून सुटल्यावर तो ड्रेस आणण्यासाठी दुकानात गेला होता. त्याठिकाणी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता तो ठिकठाक असल्याचं दिसतं. ड्रेस घेऊन मुलगा घरी गेला होता असंही प्राचार्य म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"