उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये आरोग्य विभागाच्या पथकाने एका फेक डॉक्टरवर कारवाई केली आहे. तक्रारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ओपीडी सुरू असल्याचं दिसून आलं. जिथे चंद्रभान नावाचा 12वी पास तरुण औषधं कागदावर लिहून देऊन लोकांवर उपचार करत होता.
चंद्रभानने स्वतः सांगितलं की, तो बारावी पास आहे आणि डॉक्टर म्हणून उपचार करत आहे. कारण, ज्या डॉक्टरचं हे क्लिनिक होतं, ते आजारपणामुळे गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीत उपचारासाठी दाखल आहेत. त्याचे नाव महावीर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महावीर याच्याकडेही डॉक्टरची कोणतीही डिग्री आणि मान्यता नाही.
संपूर्ण प्रकरणानंतर, आरोग्य विभागाच्या पथकाने क्लिनिकमध्ये उपस्थित असलेली प्रिस्क्रिप्शन आणि इतर वस्तू गोळा केल्या. तसेच बिलारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 12वी पास चंद्रभान आणि क्लिनिक मालक महावीर यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 420, इंडियन मेडिकल कौन्सिल कायदा 1956 चे कलम 15(2), 15(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुरादाबाद एसीएमओ डॉ. संजीव बेनवाल म्हणाले की, तक्रार मिळाली आहे. आम्ही टीमसोबत तिथे पोहोचलो तेव्हा चंद्रभान नावाची व्यक्ती रुग्णांवर उपचार करत होती. लोकांना औषधे लिहून देत होता. त्याला विचारले असता हे कोणाचं क्लिनिक आहे त्यावर त्याने महावीरचं असल्याचं सांगितलं. क्लिनिक सील करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.