मुंबई - राज्य पोलीस दलात अनियमित काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदल्याचे सत्र सुरुच असून आज दोन आयपीएस अधिकाऱ्यांसह १३ अधीक्षक/उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले परीवेक्षाधीन आयपीएस जयंत मीना यांची अमरावती ग्रामीणला अप्पर अधीक्षक म्हणून तर अशोक मोराळे यांची राज्य राखीव दलाच्या पुणे बटालियनमध्ये नियुक्ती करण्यात आली. अन्य अधिकाऱ्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा सुधारणा अधिनियम २०१४ च्या कलम २२ (न) अन्वये विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांच्या संमतीने १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी अमरावती ग्रामीण येथून बदली करण्यात आलेल्या मिलन मकानदार यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे बजाविण्यात येणार असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. बदली झालेल्या अन्य अधिकाऱ्यापैकी शर्मिष्ठा वालावलकर, चेतना तिडके व डॉ.वैशाली कडूकर यांची पदोन्नतीवर नागरी हक्क संरक्षण (पीसीआर) विभागात अनुक्रमे अमरावती, नागपूर, व नाशिक येथे बदली करण्यात आली होती. मात्र, तीनही अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी हजर न होता परस्पर अन्यत्र बदली करुन घेतली आहे. त्यामध्ये वालावलकर यांनी नाशिक ग्रामीण तर तिडके आणि कडूकर यांनी अनुक्रमे नाशिकला पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य व कोल्हापूर पीसीआर याठिकाणी बदली केली आहे. त्याशिवाय नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या पोर्णिमा चौगुले व प्रशांत वाघुडे यांची अनुक्रमे नाशिक शहर व अकोल्यातील प्रशिक्षण महाविद्यालयात प्राचार्य म्हणून बदली करण्यात आली आहे. नाशिक येथील विजय मगर यांची नाशिक पीसीआरला बदली केली आहे. विजय चव्हाण यांची पोलीस अकादमीला तर प्रतिक्षेत असलेल्या मितेश घट्टे यांची पुणे शहरात नियुक्ती केली आहे. सोलापूर ग्रामीणचे अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते यांची राज्य महामार्ग पुणे येथे तर तेथील अमोल तांबे यांची सोलापूर ग्रामीणला बदली केली आहे.
पुणे एसआरपीचे पद डाऊनग्रेड
राज्य राखीव दलाच्या पुणे बटालियनचे प्रमुख पद हे विशेष महानिरीक्षक दर्जाचे होते. मात्र आज अशोक मोराळे यांची त्यापदावर नियुक्तीसाठी त्याचा दर्जा दोन श्रेणीने पदावनत करुन उपायुक्त दर्जाचे करण्यात आले आहे.