मुंबई - ठाण्यात राहणाऱ्या एका २६ वर्षीय चोरट्याने कर्ज फेडण्यासाठी मालकाच्या दुकानातील तब्बल १३ लाख रुपयांची महागडी घड्याळेच विकल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी नईम हकिकुल्ला खान याला अटक केली आहे. न्यायालयाने नईमला २१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ठाणे येथील ताहेरबाग आनंद कोळीवाडा परिसरात नईम आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. घरात खाणाऱ्या हातांची संख्या जास्त आणि कमावणारा फक्त नईम होता. नईम हा नरीमन पॉईंट येथील क्राॅस रोड २ वरील लाॅजीग, रॅडो, टेसो घड्याळाच्या शोरूममध्ये मॅनेजर म्हणून कामाला होता. मात्र, मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीत नईमचे घर चालत नव्हते. त्यामुळे त्याने अनेकांकडून पैसे उसणे घेतले होते. त्यामुळे देणेकऱ्यांची घरी रिघ कायमच होती. शोरूममधील सर्व वस्तूंची जबाबदारीच त्याच्यावर असल्यामुळे दुकानातील १३ लाख ८४ लाख रुपयांची महागडी घड्याळे त्याने चोरी करून विकून आपले कर्ज फेडले. मात्र,शोरूममधील आॅडीटच्यावेळी कमी असलेल्या १३ महागड्या घड्याळांच्या विक्रीचा हिशोब कंपनीच्या आॅडिटरला लागत नसल्यामुळे चौकशी करण्यात आली. त्यावेळी नईमने ही घड्याळे शोरूममधून चोरून विकल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी कंपनीकडून मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार नईमला पोलिसांनी अटक केली आहे.