मुले पालकांच्या खात्यातील पैसे उडवत आहेत, पैसे गेल्यानंतर या लोकांना जाग येत आहे. असाच एक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. सरकारी नोकरीतून रिटायर झालेले आजोबा खात्यातून थोडे थोडे पैसे कसे गेले म्हणून सायबर सेलकडे पोहोचले. तपासात नातवाचे नाव आल्यावर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.
नातवाने थोडेथोडके नव्हे तर थोडे थोडे करून १३ लाख रुपये उडविले आहेत. आजोबांनी जेव्हा बँकेचे पासबूक पाहिले तेव्हा त्यांच्या खात्यातून थोडी थोडी रक्कम त्यांना न कळविताच काढण्यात आल्याचे समजले. ही सर्व ऑनलाईन ट्रान्झेक्शन होती. यामुळे बँकेतल्यांनी त्यांना सायबर पोलिसांत जाण्यास सांगितले. आजोबा तिथून सायबर पोलिसांत गेले आणि त्यांना याबाबत सांगितले.
या पैशांचा वापर ऑनलाईन गेमिंग आणि मोबाईल फोनच्या खरेदीसाठी करण्यात आला होता. परंतू, धक्कादायक बाब ही होती की अल्पवयीन असलेल्या नातवाला ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनापासून मुक्त करण्यात आले होते. यामुळे नातू पुन्हा एकदा ऑनलाईन गेमच्या नादी लागल्याने आजोबांसह कुटुंबाच्या पायखालची वाळू सरकली आहे.
पोलिसांच्या चौकशीत नातवानेही हे कबुल केले आहे. पैशांच्या व्यवहारासाठी त्याने आजोबांच्या मोबाईलचा वापर केला होता. तसेच तो पैसे कापल्याचे आलेले मेसेज डिलीट करत होता. यामुळे आजोबांनाही त्याची खबर लागत नव्हती. गेम पॉइंट, क्रिकेट किट आणि दोन मोबाईल आदी खरेदी करून त्याने घरच्यांना कळू नये म्हणून मित्राच्या घरी लपविले होते.