जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब जुमा (former President Jacob Zuma) यांच्या अटकेनंतर तिथे मोठा आगडोंब उसळला आहे. अनेक भागात लुटालूट आणि हिंसाचार होत आहे. या हिंसाचाराचा मोठा फटका १३ लाख भारतीयांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. परिस्थीतीचे गांभीर्य पाहून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आफ्रिकेच्या मंत्र्यांना फोन करून चर्चा केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या जो हिंसाचार सुरु आहे, त्याचा थेट संबंध उत्तर प्रदेशच्या गुप्ता बंधूंशी आहे. ('Worst civil unrest since 1994': How South Africa plunged into riots, looting and turmoil.)
जोहान्सबर्ग आणि क्वाजुलु नटालमध्ये भारतीयांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे. सध्या तरी 13 लाख भारतीय संकटात नाहीत, परंतू वारे वाहू लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारला सुरक्षा दलांना पाठविण्याची विनंती केली आहे, परंतू ते पाठवत नाहीएत असे तेथील भारतीय समुहाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भारतीयांची दुकाने, व्यवसाय, कंपन्यांना आगी लावल्या जात आहेत. घरे पेटवली जात आहेत. लुटालूट सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष रामफोसा यांनी देशाला संबोधताना संधीसाधू लोक परिस्थितीचा फायदा उठवत आहेत, असे म्हटले आहे. या घटना राजकीय किंवा समाजाविरोधात नाहीत, तर गुन्हेगारी स्वरुपाच्या आहेत.
हा हिंसाचार जेकब जुमा यांना न्यायालयाने अवमान केल्याच्य़ा आरोपांखाली 15 महिन्यांची शिक्षा सुनावली व यानंतर जुमा यांनी आत्मसमर्पण केल्याने उसळला आहे. जुमा यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला न्यायालयात हजर राहण्यास जुमा यांनी नकार दिला. यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या भ्रष्टाचारात उत्तर प्रदेशच्या सहारनपूरच्या गुप्ता बंधूंचा हात आहे. ते देखील आरोपी असल्याने त्यांना युएईवरून आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
पन्नास अब्ज रँडच्या भ्रष्टाचारामध्ये जुमा मुख्य आरोपी असून तीन गुप्ता बंधू देखील यामध्ये आहेत. गुप्ता बंधूंनीच हा भ्रष्टाचार घडवून आणला आहे. त्यांनी जुमा यांच्या दोन मुलांनाही फायदा मिळवून दिला आहे. यामुळे भारतीयांना लक्ष्य केले जात आहे.