नवी दिल्ली - गुरुग्राममध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) अधिकाऱ्याकडे सापडलेल्या संपत्तीमुळे खळबळ उडाली आहे. आयपीएस अधिकारी असल्याचं भासवत लोकांची फसवणूक करून त्याने तब्बल 100 कोटींहून अधिकची मालमत्ता जमा केली होती. प्रवीण यादव असं या अधिकाऱ्याचं नाव असून पोलिसांनी आता या अधिकाऱ्याला अटक केली आहे. प्रवीण बीएसएफमध्ये डेप्युटी कमांडंट होता. गुरुग्राम येथील मानेसरमधील राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयात कार्यरत होता. या अधिकाऱ्याकडे 14 कोटींची रोख रक्कम, दागिने आणि सात महागड्या सापडल्या आहेत. या गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, जीप आणि मर्सिडीज यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राम पोलिसांनी अधिकाऱ्यासोबत त्यांची पत्नी ममता यादव, बहिण रितू आणि सहकाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत प्रवीण यादव यांने लोकांना राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयाच्या परिसरात बांधकामाचं कंत्राट मिळवून देण्याचं आश्वासन देत कोट्यावधी रुपये घेतल्याचं आता समोर आली आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हे सर्व पैसे एनएसजीच्या नावे सुरू केलेल्या खोट्या खात्यात जमा केले होते. हे खातं त्याची बहिण रितू यादवने उघडलं होतं. रितू यादव एक्सिस बँकेत मॅनेजर आहे.
लोकांची फसवणूक करत पैसा मिळवण्याचा आखला कट
गुरुग्राम पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त (क्राइम) प्रीतपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण यादवला शेअर बाजारात 60 लाखांचं नुकसान झालं होतं. त्याने लोकांची फसवणूक करत हा सगळा पैसा मिळवण्याचा कट आखला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण यादवला आगरतळा येथे पोस्टिंग मिळाली होती. पण त्यांनी इतकी संपत्ती जमा केली होती की, काम करण्यापेक्षा त्याने काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त
एनएसजी परिसरात शनिवारी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. एसआयटीसोबत एनएसजीची टीम देखील उपस्थित होती. सध्या तपास सुरू असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. आणखी काही ठिकाणी छापा टाकण्यात येऊ शकतो. प्रवीण यादव आणि नवीन यादव याचे नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांची माहिती काढली जात आहे. आतापर्यंत पोलिसांच्या टीमेने जवळपास 43 अकाऊंट फ्रीज केली आहे. संपत्ती आणि अकाऊंट संबंधित माहितीचा पोलीस शोध घेत असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.