अंबरनाथ: अंबरनाथ स्टेशन रोडवरील राजेश मोबाईल शॉप मध्ये रात्रीच्या वेळेस दुकानाचा पत्रा तोडून दुकानातील तब्बल 14 लाखांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी गजाड केला आहे. चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी ब्लेडच्या सहाय्याने पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेतला. विशेष म्हणजे या चोरट्याच्या विरोधात एकही गुन्हा दाखल नसल्याने पोलिसांना चोरट्याचा शोध घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
मोहम्मद फिरोज नईम अहमद या 33 वर्षीय तरुणाने एक ऑक्टोंबरच्या रात्री राजेश मोबाईल स्टोअर फोडून त्या दुकानातील ब्रँडेड मोबाईल आणि स्मार्टवॉचची चोरी केली होती. या चोरीसाठी दुकानाचे पत्रे आणि त्यावरील ग्रील कापण्यासाठी लोखंडी ब्लेडचा वापर करण्यात आला होता. दुकानात चोरी केल्यानंतर चोरट्याने दुकानातील डिव्हीआर देखील लंपास केला होता. त्यामुळे चोरट्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक झाले होते. कोणतेही पुरावे नसतानाही अंबरनाथ पोलिसांनी दुकानाचा पत्रा कापण्यासाठी जी लोखंडी ब्लेड वापरण्यात आली होती, ब्लेड कोणत्या दुकानातून खरेदी केली गेली, याचा शोध घेत त्यासंबंधित दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा तपास केला. मात्र, अटक आरोपीच्या विरोधात या अधी कोणताही गुन्हा नसल्याने त्याची ओळख पटणे अवघड गेले होते.
तरीदेखील पोलिसांनी या आरोपीला आंबरनाथ येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडुन 14 लाखांच्या मुद्देमाला पैकी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर उर्वरित चार लाखांचा मुद्देमाल त्याने त्याच्या मित्राकडे विकण्यासाठी दिल्याची कबुली दिली आहे. हा आरोपी तीन वेळा सऊदी अरेबियामध्ये देखील कामाच्या शोधासाठी गेला होता, तर अंबरनाथमध्ये तो आपल्या भावाकडे राहण्यासाठी आला होता अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. या चोरी आधी संबंधित चोरट्याने इतर कुठे चोरी केली होती का याचा देखील आता पोलिस तपास करीत आहेत.